Stock Market Updates : भारतातील आघाडीची दुचाकी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. मागील ८ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल २० टक्क्यांची घट झाली आहे. आजच्या दिवशीही घसरण कायम राहिल्यानं शेअरचा भाव १०० रुपयांच्याही खाली आला आहे. आज हा शेअर ९७.८५ रुपयांवर आला आहे.
ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ नुकताच आला आहे. लिस्टिंगनंतर हा शेअर चांगला वाढला होता. मात्र, ही वाढ थांबली आणि शेअरनं उलट्या दिशेनं प्रवास सुरू केला. गेल्या आठ सत्रात शेअरमध्ये २० टक्के खाली आला. अलीकडंच शेअरनं १५७ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. त्या उच्चांकी पातळीवरून शेअरची ३८ टक्के घसरण झाली आहे.
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरमध्ये घसरणीची अनेक कारणं आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कंपनीचा बाजारपेठेतील वाटा घटण्याची गुंतवणूकदारांची वाटत असलेली चिंता हे एक कारण आहे.
आयसीई (अंतर्गत दहन इंजिन) बाजारपेठेतील प्रमुख कंपन्या सातत्यानं त्यांच्या उत्पादनात वाढ करत असून अधिकाधिक स्वस्त किंमतींमध्ये नवीन ईव्ही मॉडेल्स सादर करीत आहेत. त्याचा फटका ओला इलेक्ट्रिकला बसत आहे.
अँकर गुंतवणूकदारांचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली झाली आहे. शेअर बाजारातील पदार्पणानंतर केवळ सहा सत्रांत कंपनीच्या शेअरमध्ये ७३ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर आता अनेक गुंतवणूकदार नफा पदरात पाडून घेत आहेत.
ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीनंतरच्या सेवेबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. सुटे भाग मिळणं अवघड असल्यानं सर्व्हिसिंगमध्ये बराच विलंब होत आहे. ओला इलेक्ट्रिकची भारतातील विविध सर्व्हिस सेंटर्सकडे दरमहा सुमारे ८० हजार तक्रारी येत आहेत. त्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्यामुळंही गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
ओला इलेक्ट्रिकचा बाजारातील हिस्सा जुलैमधील ३९ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ३१ टक्क्यांवर घसरला असून, तीव्र स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या स्थितीबाबत विश्लेषकांमध्ये चिंता वाढली आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म अँबिट कॅपिटलच्या अंदाजानुसार, भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठ अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि वाढत्या स्पर्धेमुळे ओला इलेक्ट्रिकच्या मार्केट शेअरवर दबाव येऊ शकतो. ओलाचा बाजार हिस्सा आर्थिक वर्ष २०२४ मधील ३५ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत २७.५ टक्क्यांपर्यंत कमी होईल आणि आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत खाली येईल. त्यामुळं या ब्रोकरेजनं 'सेल' रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस १०० रुपये ठेवली होती. ते खरं ठरलं आहे.
एचएसबीसी सिक्युरिटीजनंही ओला इलेक्ट्रिकच्या नुकत्याच झालेल्या मार्केट शेअरच्या तोट्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्याचा कल असाच कायम राहिल्यास आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत मार्केट शेअरमध्ये १५ ते २० घट होण्याचा धोका एचएसबीसी सिक्युरिटीजनं वर्तवला आहे.
एलारा कॅपिटलच्या म्हणण्यानुसार, हिरो, बजाज, टीव्हीएस आणि एथर एनर्जी सारख्या स्पर्धकांना त्यांच्या संथ वाढीमुळं सुरुवातीला उद्योगाचं ‘कासव’ म्हणून पाहिलं जातं होतं, आता त्यांचा बाजारातील हिस्सा वाढण्याची अपेक्षा आहे. गुणवत्तेवर भर देत अधिक परवडणाऱ्या स्कूटर्स लाँच करून आणि वितरणाचं जाळं विस्तृत करून हे साध्य करण्याची त्यांची योजना आहे.