Ola Electric Scooter: ओला इलेक्ट्रिकने 'बॉस ऑफ ऑल सेव्हिंग्स' हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत ओला एस १ इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी सूट मिळत आहे. कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या ओला सीझन सेल मोहिमेचा हा एक भाग आहे. दरम्यान, पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरच्या तुलनेत कमी रनिंग आणि मेंटेनन्स कॉस्टमुळे ग्राहकांना आता ओला एस १ च्या खरेदीवर १५,००० रुपयांपर्यंत सूट आणि ३०,००० रुपयांपर्यंतची संभाव्य वार्षिक बचत मिळू शकते.
ओलाचे म्हणणे आहे की, ओला एस १ एक्स मुळे दररोज ३० किमीचे प्रवास अंतर असलेल्या ग्राहकांना वार्षिक ३१,००० रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. एवढेच नव्हेतर काही वर्षात ग्राहक या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमतही वसूल करू शकतात.
ओला इलेक्ट्रिकच्या एस १ पोर्टफोलिओमध्ये सहा मॉडेल्सचा समावेश आहे. प्रीमियम एस १ प्रो आणि एस १ एअरची किंमत अनुक्रमे १ लाख ३४ हजार ९९९ रुपये आणि १ लाख ०७ हजार ४९९ रुपये आहे. २ किलोवॉट, ३ किलोवॉट आणि ४ किलोवॉट व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेल्या एस १ एक्स रेंजची किंमत अनुक्रमे ७४ हजार ९९९ रुपये, ८७ हजार ९९९ रुपये आणि १ लाख ९९९ रुपये आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये ओला इलेक्ट्रिकने शेअर बाजारात पदार्पण केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी २३ हजार ९६५ इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात कमी मासिक विक्री नोंदवली. कडक स्पर्धा आणि विक्रीनंतरच्या सेवेबद्दल वापरकर्त्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे या स्कूटरच्या किंमती सुमारे ३५ टक्क्यांनी घसरल्या. गेल्या वर्षी याच महिन्यात या स्कूटरच्या किंमती ४७ टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत घसरल्या.
दरम्यान, सणासुदीच्या काळात कंपनीने स्कूटरवर दिलेल्या सूटमुळे ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत पुन्हा उसळी आली. ऑक्टोबर महिन्यात या स्कूटरच्या ५० हजारांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली आणि ४१ हजार ६०५ युनिट्सची नोंदणी करण्यात आली. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कंपनीने आपले अव्वल स्थान कायम राखले असून ३० टक्के मार्केट शेअर आहे. ऑक्टोबर मध्ये नोंदणीत ७४ टक्क्यांनी वाढ झाली असून सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत महिन्याच्या विक्रीत १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.