Nykaa Share Price : नायका कंपनीचा शेअर खरेदी करावा की नाही? तिमाही निकालानंतर तज्ञांनी काय दिला सल्ला?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Nykaa Share Price : नायका कंपनीचा शेअर खरेदी करावा की नाही? तिमाही निकालानंतर तज्ञांनी काय दिला सल्ला?

Nykaa Share Price : नायका कंपनीचा शेअर खरेदी करावा की नाही? तिमाही निकालानंतर तज्ञांनी काय दिला सल्ला?

Published Feb 11, 2025 01:14 PM IST

Nykaa Share Price : आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या दमदार निकालांनंतर इंट्रा-डे ट्रेडमध्ये नायकाच्या शेअर्समध्ये मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी या शेअरवर विश्वास व्यक्त केला आहे.

Nykaa share price : तिमाही निकालानंतर नायकाचा शेअर खरेदी करण्यासारखा आहे का? जाणून घ्या!
Nykaa share price : तिमाही निकालानंतर नायकाचा शेअर खरेदी करण्यासारखा आहे का? जाणून घ्या!

Stock Markets : डिसेंबर तिमाही (आर्थिक वर्ष २०२५) निकालांनंतर ब्युटी, वेलनेस आणि फॅशन प्रॉडक्ट्स ब्रँड नायका कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार सुरू आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी, ११ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे ३ टक्क्यांची वाढ झाली. नंतर हा शेअर १ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नायका ब्रँडची ऑपरेटर रिटेल कंपनी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सनं सोमवारी, १० फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाल्यानंतर डिसेंबर तिमाहीचे चांगले आकडे नोंदवले.

नायकाच्या शेअरचा भाव आज बीएसईवर १७१.८५ रुपयांवर खुला झाला. यापूर्वी तो १६९.६० रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर या शेअरनं गेल्या बंदच्या तुलनेत २.९४ टक्क्यांनी वधारून १७४.६० रुपयांच्या दिवसभरातील उच्चांकी पातळी गाठली. 

तिमाही निकालाचा तपशील

एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ६१.४३ टक्क्यांनी वाढून २६.१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील १०.०४ कोटी रुपयांच्या तुलनेत एकत्रित निव्वळ नफा १६०.२ टक्क्यांनी वाढला आहे.

आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत नायकाचं कामकाजातून एकत्रित उत्पन्न २६.७४ टक्क्यांनी वाढून २२६७.२१ कोटी रुपये झालं आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ते १७८८.८० कोटी रुपये होतं. कंपनीच्या उत्पन्नात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तज्ञ काय म्हणतात…

काही तज्ञांनी कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीचं कौतुक केलं आणि निरोगी वाढीसाठी कंपनी चांगल्या स्थितीत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

 एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सनं तिसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली असून करोत्तर नफा ६१ टक्क्यांनी वाढून २६ कोटी रुपये झाला आहे. ब्युटी आणि फॅशन सेगमेंटमधील दमदार मागणीमुळं टॉपलाइन वाढीला हातभार लागला. नायकाची कामगिरी वाढत्या ई-कॉमर्समधील लवचिकता अधोरेखित करते आणि भविष्यातील विस्ताराचा संकेत देते, असं लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी सांगितलं.

हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी महेश एम ओझा म्हणाले की, टेक्निकल चार्टवर नायकाच्या शेअरच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. गुंतवणूकदार १८५ ते २०० रुपयांच्या नजीकच्या उद्दिष्टासाठी नायकाचे शेअर्स १६७ ते १६९ रुपये प्रति शेअर या दरानं खरेदी करू शकतात. मात्र, नवीन पोझिशन घेताना स्टॉपलॉस १५८ रुपयांपेक्षा कमी ठेवावा लागेल. नायकाचे शेअरहोल्डर्स १५८ रुपयांपेक्षा कमी स्टॉप लॉस कायम ठेवूनही शेअर होल्ड करू शकतात, असं ओझा यांनी सांगितलं.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner