NTPC Green Energy Share Price : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ आज शेअर बाजार सूचीबद्ध झाला. मात्र, शेअरची लिस्टिंग अपेक्षाभंग करणारी ठरली. हा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत केवळ ३.२ टक्क्यांनी वाढून एनएसईवर १११.५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. मात्र, लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यामुळं शेअर उसळला.
लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी शेअरची जोरदार खरेदी केली. त्यामुळं एनएसईवर हा शेअर १२२.६५ रुपयांच्या उच्चांकी किमतीवर पोहोचला आणि इश्यू प्राइसच्या तुलनेत १३.५६ टक्क्यांची वाढ नोंदवली. विश्लेषक या शेअरबाबत दीर्घकालीन दृष्टीकोनातून आशावादी आहेत.
आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांना 'शेअर मार्केट टुडे'चे सहसंस्थापक व्हीएलए अंबाला यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कंपनीची भक्कम आर्थिक बाजू आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील संभाव्या संधींच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी किमान दोन वर्षे हा शेअर स्वत:कडं ठेवावा, असं अंबाला यांनी सुचवलं आहे.
आयपीओ न लागलेले गुंतवणूकदार योग्य वेळी यात गुंतवणूक करू शकतात, परंतु त्यांनीही दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवावा. अल्पकाळात यातून फारसा परतावा मिळण्याची शक्यता नाही, असं ते म्हणाले. तीन ते सहा वर्षे वाट पाहू शकणारे गुंतवणूकदार २५० ते ६०० रुपयांच्या किंमतीचं लक्ष्य ठेवू शकतात, असंही अंबाला यांनी सुचवलं आहे.
मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (रिसर्च) प्रशांत तापसे म्हणाले, 'अपेक्षेप्रमाणे एनटीपीसी ग्रीन एनर्जीची लिस्टिंग थंड झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही गुंतवणुकीसाठी एक उत्तम संधी आहे, असं तापसे म्हणाले. ग्रीन हायड्रोजन, रसायने आणि बॅटरी स्टोरेजमध्ये एनटीपीसी ग्रीनचा धोरणात्मक विस्तार भारताच्या ऊर्जा संक्रमणात अग्रस्थानी आहे, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ लागला आहे. त्यांनी मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून हा शेअर होल्ड करावा, असं मत 'स्टोक्सबॉक्स'चे संशोधन प्रमुख मनीष चौधरी यांनी व्यक्त केलं. तब्बल पाच दशकांचा वारसा, व्यापक अनुभव, धोरणात्मक भागीदारी, प्रगत ऑपरेशन्स आणि देखभाल (ओ अँड एम) तंत्रज्ञान आणि इन-हाऊस कौशल्याचा वापर करून अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा कार्यक्षमतेने विकास, खरेदी आणि संचालन ही कंपनीची जमेची बाजू आहे.