Share Market News Today : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेला एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर उत्तरोत्तर वधारत आहे. आता शेअरच्या वाटचालील आणखी बळ मिळालं आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (SECI) कंपनीला ५०० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचं कंत्राट मिळालं आहे. त्यामुळं शेअरमध्ये तेजी आली आहे.
आज सुरुवातीच्या सत्रात शेअरमध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर आज १५२.५१ रुपयांवर उघडला आणि १५४.४० रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा शेअर १.७१ टक्क्यांनी वधारून १४९.१६ रुपयांवर व्यवहार करत होता.
एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअर २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत २३ टक्क्यांनी वाढला आहे. काही दिवसांपूर्वी या शेअरनं १५५.३५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. शेअरचा आतापर्यंतचा नीचांकी स्तर १११.५० रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या लिलावात एकूण १००० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा साठवणूक प्रणाली (ईएसएस) बसवण्याचा समावेश आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीनं ३.५२ रुपये प्रति किलोवॅट दरानं ५०० मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचं कंत्राट मिळवलं आहे.
निविदा अटींनुसार, कंपनीला कंत्राटी सौर क्षमतेसह २५० मेगावॅट / १००० मेगावॅटची ऊर्जा साठवण प्रणाली स्थापित करायची आहे. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत एनटीपीसी समूहाची अक्षय ऊर्जा क्षमता ४.१ गिगावॅट होती. सुमारे २१ गिगावॅट बांधकाम व निविदा काढण्याच्या विविध टप्प्यात होतं.
बीएसईवर हा शेअर १०८ रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा ३.३३ टक्क्यांनी वाढून १११.६० रुपयांवर लिस्ट झाला. त्याचप्रमाणे एनएसईवर १११.५० रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा ३.२४ टक्क्यांच्या प्रीमियमसह २७ नोव्हेंबरला शेअरनं आपले पहिले ट्रेडिंग सत्र सुरू केलं.
दिल्ली स्थित एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर या किमतीत सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जीनं एकूण १०,००० कोटी रुपये उभे केले. हा पूर्णपणे न्यू इश्यू होता. कंपनीनं १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर या प्राइस बँडमध्ये १३९ शेअर्सच्या लॉट साईजसह आपले शेअर्स ऑफर केले. हा इश्यू केवळ २.४२ पट सब्सक्राइब झाला.
संबंधित बातम्या