IPO News : एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या १० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या १० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी

IPO News : एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या १० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 28, 2024 06:48 PM IST

NTPC Green Energy IPO : एनटीपीसीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या १० हजार कोटींच्या आयपीओला सेबीनं मंजुरी दिली आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ

NTPC Green Energy IPO : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओला सेबीनं अखेर मंजुरी दिली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC)च्या या उपकंपनीला १०,००० कोटी रुपये उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. कंपनीनं गेल्या महिन्यात १८ सप्टेंबर २०२४ रोजी सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली होती.

३० जून २०२४ पर्यंत एनटीपीसी ग्रीन ३७ सौर प्रकल्प आणि ९ पवन ऊर्जा प्रकल्पांद्वारे १५ ऑफटेकर्सशी जोडली गेली आहे. कंपनी ७ राज्यांमध्ये ३१ नुतनीकृत ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. त्याची एकूण क्षमता ११ हजार ७७१ मेगावॅट इतकी आहे. याशिवाय कंपनी १४ सौर प्रकल्प आणि २ पवन ऊर्जा प्रकल्प चालवत आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ कधी उघडणार? 

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी कधी खुला होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. आयपीओच्या माध्यमातून कंपनी १० रुपयांच्या अंकित मूल्याचे शेअर्स जारी करणार आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून सवलतीच्या दरात शेअर्स देण्यात येणार आहेत. आयपीओमधून जमा झालेल्या पैशांचा वापर कंपनी कर्ज फेडण्यासाठी तसेच इतर कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?

एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या महसुलात आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ दरम्यान ४६.८२ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल १९६२.६० कोटी रुपये होता. जून तिमाहीत एनटीपीसीचा महसूल ५७८.४४ कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा करोत्तर नफा १३८.६१ कोटी रुपये होता.

आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. या इश्यूसाठी रजिस्ट्रार म्हणून केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner