interest rates : अल्पबचत योजनांचे नवे व्याजदर जाहीर; PPF, सुकन्या समृद्धीच्या खातेधारकांना झटका
Small Savings Schemes News in Marathi : अल्प बचत गुंतवणूक योजनांवरील नवे व्याजदर केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत.
Interest rates on Small Savings Schemes : वर्ष संपत असताना केंद्र सरकारनं छोट्या गुंतवणूकदारांना 'गुड न्यूज' दिली आहे. अल्प बचत योजनांचे जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठीचे व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत. केंद्राच्या या नव्या निर्णयाचा अनेक गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. मात्र, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची या निर्णयामुळं निराशा झाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
नव्या निर्णयानुसार, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर १ जानेवारीपासून सात टक्के दराने व्याज मिळणार आहे. सध्या एनएससीवर ६.८ टक्के व्याज आहे. तसंच, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्याच्या ७.६ टक्क्यांऐवजी आठ टक्के व्याज मिळेल. एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेवरील व्याजदर १.१ टक्क्यांनी वाढला आहे.
नवीन निर्णयानुसार, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवींवर एक वर्षासाठी ६.६ टक्के, दोन वर्षांसाठी ६.८ टक्के, तीनसाठी ६.९ टक्के आणि पाच वर्षांसाठी ७ टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय मासिक उत्पन्न योजनेत ६.७ टक्क्यांऐवजी आता ७.१ टक्के व्याज मिळणार आहे.
KVP गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा
किसान विकास पत्रमधील १२३ महिेने मुदतीच्या गुंतवणुकीवर सध्या ७ टक्के दरानं व्याज मिळतं. यात केंद्र सरकारनं महत्त्वाचा बदल केला आहे. यापुढं १२० महिने मुदतीच्या केव्हीपी योजनेवर ७.२ टक्के दरानं व्याज मिळणार आहे. योजनेचा 'लॉक इन' कालावधी कमी करतानाच सरकारनं व्याजही वाढवलं आहे. हा दुहेरी फायदा गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
सुकन्या आणि PPF च्या खातेदारांची निराशा
पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांना केंद्र सरकारकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. या दोन्ही योजनांच्या व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर ७.६ टक्के कायम ठेवण्यात आला आहे, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) वरील सध्याचा ७.१ टक्के व्याजदर 'जैसे थे' राहणार आहे. याशिवाय बचत ठेवींवर वार्षिक ४ टक्के दरानं व्याज मिळत राहील.