एनपीएस, IMPS ते फास्टॅग… यापैकी कशाशीही तुमचा संबंध असेल तर ही बातमी नक्की वाचा!-nps imps fastag rules to change from 1 february 2024 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एनपीएस, IMPS ते फास्टॅग… यापैकी कशाशीही तुमचा संबंध असेल तर ही बातमी नक्की वाचा!

एनपीएस, IMPS ते फास्टॅग… यापैकी कशाशीही तुमचा संबंध असेल तर ही बातमी नक्की वाचा!

Jan 29, 2024 08:51 AM IST

Financial Changes from 1 February : सर्वसामान्यांवर थेट परिणाम करणारे काही आर्थिक बदल येत्या १ फेब्रुवारीपासून होणार आहेत. काय आहेत हे बदल? जाणून घेऊया…

Financial Rules Changes
Financial Rules Changes

Financial Rules changes from February : येत्या १ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकार २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. देशाच्या अर्थकारणाशी संबंधित ही घडामोड होणार असतानाच फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम करणारे काही बदल होणार आहेत. एनपीएस, आयएमपीएस, फास्टॅगच्या नियमात महत्त्वाचे बदल होणार आहेत.

NPS खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा

पेन्शन नियामक PFRDA नं नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हा नवा नियम १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नव्या नियमामनुसार एनपीएस सदस्यांना पेन्शन खात्यातून २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. खातेदार केवळ त्याच्या वैयक्तिक पेन्शन खात्यातून रक्कम काढू शकेल. नियोक्त्याच्या (Employer) योगदानातून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. यासोबतच खात्यातून जास्तीत जास्त तीन वेळा पैसे काढता येतील. पैसे मिळवण्यासाठी सदस्यांना त्यांच्या बँक खात्याची त्वरित पडताळणी करावी लागेल.

Dividend Stocks : तब्बल २५ कंपन्या देणार लाभांश; चालू आठवड्यात गुंतवणुकीची संधी

आयएमपीएसची मर्यादा 

इमिजिएट पेमेंट सेवेद्वारे (IMPS) एखाद्या लाभार्थीच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवता येणार आहे. १ फेब्रुवारीपासून ही सुविधा सुरू होईल. बँकेशी संबंधित व्यवहार अधिक वेगवान आणि अचूक व्हावेत म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नं आयएमपीएस अपग्रेड केलं आहे. त्यामुळं लाभार्थीचा केवळ मोबाइल नंबर आणि बँक खाते व नाव नमूद करून पैसे पाठवले जाऊ शकतात.

फास्टॅगसाठी केवायसी सक्तीची

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नं एक वाहन, एक फास्टॅग फॉर्म्युला अंतर्गत वाहनांवर लावण्यात आलेल्या सर्व फास्टॅगची KYC करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी आणि व्यावसायिक वाहनचालकांनी ३१ जानेवारीपर्यंत केवायसी करून घेणं अपेक्षित आहे. तसं न केल्यास पुरेसा बॅलन्स असला तरी वाहनांमध्ये बसवलेला फास्टॅग १ फेब्रुवारीपासून निष्क्रिय (ब्लॅक लिस्ट) केला जाईल. अशा परिस्थितीत वाहनचालकांना टोल प्लाझावर दंड म्हणून दुप्पट टोल टॅक्स रोख स्वरूपात भरावा लागेल. कारण, विना फास्टॅग वाहनांकडून दुप्पट टोल वसूल करण्याचा नियम आहे. 

Retirement Planning: वयाच्या चाळिशीत निवृत्ती घेण्याचा विचार करताय? आर्थिक बचतीसाठी करा ‘या’ गोष्टी

गोल्ड बाँड

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या सीरिजमधील अखेरचे सोवरिन गोल्ड बाँड (SGB) फेब्रुवारी महिन्यात आणले जाणार आहेत. १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान त्याची विक्री होईल. त्याची खरेदी किंमत विक्रीच्या दिवशी ठरवली जाईल. गोल्ड बाँडमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. एखाद्या व्यक्तीला ऑफलाइन गुंतवणूक करायची असेल तर त्याला आरबीआयनं नियक्त केलेल्या बँकेच्या शाखेत जावं लागेल. तिथं फॉर्म भरून सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. याआधी आरबीआयनं १८ ते २२ डिसेंबर दरम्यान गोल्ड बाँड आणले होते.

वाहनांच्या किमती वाढणार

टाटा मोटर्सनं (Tata Motors) पुढील महिन्यापासून इलेक्ट्रिक वाहनांसह (EVs) सर्व प्रवासी वाहनांच्या किमतींमध्ये सरासरी ०.७ टक्के वाढ जाहीर केली आहे. टाटा मोटर्सनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ही दरवाढ १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू होईल. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.

Whats_app_banner
विभाग