Madhabi Puri Buch : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सेबीनं गुंतवणूकदारांना अधिकाधिक पर्याय देण्याच्या विचारात आहे. यापुढं २५० रुपये भरून देखील म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. आर्थिक ताकद कमी असलेल्या, पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनी नव्या पर्यायाची माहिती दिली. सध्या बहुतांश म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांना एसआयपीच्या माध्यमातून ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करण्याची सुविधा देतात. मात्र, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना किंवा तळागाळातील लोकांना ५०० रुपयांची एसआयपी परवडेलच असं नाही. अशा वेळी अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून दिल्यास कोट्यवधी लोकांना फायदा होऊ शकतो, हा यामागचा उद्देश आहे.
मायक्रो-एसआयपी हा पारंपारिक पद्धतशीर गुंतवणूक योजनांचा स्वस्त पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूकीसाठी महिन्याला केवळ ५० ते १०० रुपयांच्या योगदानाची आवश्यकता असते, तर पारंपारिक एसआयपीसाठी किमान ५०० रुपये आवश्यक असतात. मायक्रो-एसआयपी ग्रामीण रहिवासी, रोजंदारीवर काम करणारे आणि विद्यार्थ्यांसह कमी आर्थिक ताकद असलेल्या गुंतवणूकदारांसाठी तयार केलेल्या आहेत. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड दरमहा २५० रुपयांची देशातील पहिली एसआयपी विकसित करत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये एकूण ९.३ कोटी एसआयपी खाती होती. त्या एकूण २३,३३२ कोटी रुपये होते.
ज्या प्रकारे एखाद्या छोट्या पाऊचमध्ये शॅम्पू विकला जातो, त्याच धर्तीवर देशाच्या संपत्ती निर्मिती प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याचा उद्देश सेबीच्या या कल्पनेमागे आहे. आजचे छोटे गुंतवणूकदार उद्याचे मोठे गुंतवणूकदार ठरू शकतात. त्यांच्या वित्तीय सहभागासाठी ही चांगली सुरुवात असू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. डिजिटायझेशन देशाच्या जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. सेबीला भारतातील विद्यमान डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा फायदा घ्यायचा आहे जेणेकरून सर्वात लहान गुंतवणूकदारांना सुलभ गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील. गुंतवणूकदारांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि सेवा वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापरावर सेबीनं भर दिला आहे.
मायक्रो एसआयपी ही नवी संकल्पना नाही. अनेक म्युच्युअल फंड सध्या महिन्याला ५० ते १०० रुपये भरून एसआयपी सुरू करण्याची सुविधा देतात. मात्र, यापैकी कोणीही दरमहा २५० रुपयांची एसआयपी देत नाही. नवी एएमसी दरमहा १० रुपयांच्या एसआयपीचा पर्याय देखील देतो. मायक्रो-एसआयपीमुळे अगदी लहान गुंतवणूकदारही वित्तीय बाजाराशी जोडले जाऊ शकतील. ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.