Flipkart UPI News : पेटीएम, फोनपेला पर्याय! आता फ्लिपकार्टनं सुरू केली स्वत:ची डिजिटल पेमेंट सेवा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Flipkart UPI News : पेटीएम, फोनपेला पर्याय! आता फ्लिपकार्टनं सुरू केली स्वत:ची डिजिटल पेमेंट सेवा

Flipkart UPI News : पेटीएम, फोनपेला पर्याय! आता फ्लिपकार्टनं सुरू केली स्वत:ची डिजिटल पेमेंट सेवा

Mar 04, 2024 11:37 AM IST

Flipkart UPI Service : ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं आता डिजिटल पेमेंट (Digital Payment) व्यवसायात एन्ट्री केली असून नवा यूपीआय हँडल (UPI Handle) लाँच केला आहे.

Flipkart UPI : पेटीएमला पर्याय! आता फ्लिपकार्टनं सुरू केली स्वत:ची डिजिटल पेमेंट सेवा
Flipkart UPI : पेटीएमला पर्याय! आता फ्लिपकार्टनं सुरू केली स्वत:ची डिजिटल पेमेंट सेवा

Flipkart UPI Service launched : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं आता डिजिटल पेमेंट (Digital Payment) व्यवसायात प्रवेश केला आहे. अ‍ॅक्सिस बँकेशी (Axis bank) भागीदारीत फ्लिपकार्टनं रविवारी फ्लिपकार्ट यूपीआय ही पेमेंट सेवा सुरू केली. सुरुवातीला Android युजर्सना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर असलेली पेटीएम सध्या संकटात आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. त्यामुळं ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याशिवाय, गेल्या काही काळापासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)नं यूपीआय सेवेसाठी विशिष्ट कंपन्यांवर असलेलं अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही संधी साधत फ्लिपकार्टनं डिजिटल पेमेंट व्यवसायात शिरकाव केला आहे. लवकरच ग्राहकांना सुपरकॉइन्स, कॅशबॅक, माइलस्टोन बेनिफिट्स आणि ब्रँड व्हाउचर यांसारखे फीचर्स उपलब्ध करून दिली जातील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

२०१६ साली फ्लिपकार्टनं फोनपे (Phonepe) हे यूपीआय वॉलेट खरेदी केलं होतं. मात्र, २०२२ मध्ये पुन्हा फोनपे स्वतंत्र झालं. तेव्हापासून फ्लिपकार्ट स्वतंत्रपणे डिजिटल पेमेंटमध्ये उतरण्याची चाचपणी करत होती. अखेर ते प्रत्यक्षात आलं आहे. आता ग्राहक @fkaxis हँडलसह यूपीआसाठी नोंदणी करू शकतात आणि फ्लिपकार्ट ॲप वापरून सर्व आर्थिक व्यवहार करू शकतात. या सेवेच्या माध्यमातून ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन पेमेंट करू शकतात. याशिवाय रिचार्ज आणि बिल भरण्यासाठी सुलभ आणि जलद सेवाही उपलब्ध असतील.

‘अ‍ॅमेझॉन पे’शी टक्कर

फ्लिपकार्टला 'ॲमेझॉन पे'कडून (Amazon Pay) अटीतटीची स्पर्धेच्या सामोरं जावं लागणार आहे. फ्लिपकार्टची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी ॲमेझॉन असेल. पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या पेमेंट सेवा कंपन्यांबरोबरच ही कंपनी स्वतःची ॲमेझॉन पे सेवा देते.

फ्लिपकार्ट यूपीआयमुळं ग्राहकांना नवा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळं ही सेवा अधिक किफायतशीर होईल आणि आमच्या सेवेवर असलेला ग्राहकांचा विश्वास अधिक वाढेल, असा विश्वास फ्लिपकार्टच्या फिनटेक आणि पेमेंट विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज अनेजा यांनी व्यक्त केला.

अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड्स आणि पेमेंट विभागाचे अध्यक्ष संजीव मोघे यांनी फ्लिपकार्ट सोबतच्या भागीदारीवर आनंद व्यक्त केला. हा प्लॅटफॉर्म क्लाउडवर आधारित असल्यानं ग्राहकांसाठी उत्तम सेवा मिळेल, असं ते म्हणाले.

Whats_app_banner