Blinkit Ambulance : ‘अवघ्या १० मिनिटांत अ‍ॅम्बुलन्स होणार हजर’, ब्लिंकिटने सुरू केली नवी सेवा; किती असणार शुल्क?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Blinkit Ambulance : ‘अवघ्या १० मिनिटांत अ‍ॅम्बुलन्स होणार हजर’, ब्लिंकिटने सुरू केली नवी सेवा; किती असणार शुल्क?

Blinkit Ambulance : ‘अवघ्या १० मिनिटांत अ‍ॅम्बुलन्स होणार हजर’, ब्लिंकिटने सुरू केली नवी सेवा; किती असणार शुल्क?

Jan 02, 2025 11:32 PM IST

Blinkit Ambulance Services : दैनंदिन गरजेच्या वस्तू काही मिनिटांत पोहचवणारे इन्स्टंट डिलिव्हरी ॲप ब्लिंकिट आता रुग्णवाहिका सेवाही पुरवणार आहे. ही सेवा आजपासून गुरुग्राममध्ये सुरू झाली आहे.

BlinkIt कडून रुग्णवाहिका सेवा सुरू
BlinkIt कडून रुग्णवाहिका सेवा सुरू (Photo credit- X ( social media ))

Blinkit Ambulance : क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट (Blinkit) ने एक मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत ब्लिंकिट वरुन दैनंदिन वापराच्या वस्तू मागवल्या जात होत्या, मात्र कंपनीने आपला सेवा विस्तार करत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. आता यावरून अ‍ॅम्बुलन्स बोलावता येणार आहे. आजपासून ही सेवा गुरुग्राममध्ये सुरू झाली असून येत्या काही दिवसात देशातील अन्य शहरातही ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 गुरुग्रामसाठी सध्या पाच रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लोक ब्लिंकिट ॲपद्वारे रुग्णवाहिका बोलवू शकतात. बुक केल्यानंतर केवळ १० मिनिटात रुग्णवाहिका तुमच्या दारात उभी राहणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

 ब्लिंकिटने आजपासून गुरुग्राम शहरात आपली नवीन १० मिनिटांत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अलबिंदर ढिंडसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली. एखाद्या वस्तूच्या बाबतीत जशी ही सेवा ब्लिंकिटद्वारे दिली जाते त्याचप्रकारची सेवा यात दिली जाणार आहे. म्हणजेच ब्लिंकिटवरून एखाद्या रुग्णासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बुक केल्यास १० मिनिटांत रुग्णवाहिका हजर होणार आहे. 

५ अ‍ॅम्ब्युलन्ससोबत सुरुवात - 

ब्लिंकिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर ढींडसा यांनी सांगितले की, कंपनीने गुरुवारी गुरुग्राममध्ये आपली पहिली ५ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. जसजसे आम्ही अधिक भागात सेवेचा विस्तार करतो, तसतसे आपल्याला ब्लिंकिट अ‍ॅपद्वारे बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) रुग्णवाहिका बुक करण्याचा पर्याय दिसू लागेल.

अ‍ॅम्ब्युलन्समध्ये काय काय सुविधा मिळणार -

अल्बिंदर ढींडसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर, एईडी (ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर), स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि इमर्जन्सी मेडिसिन सारखी आवश्यक लाइफ सपोर्ट उपकरणे आहेत. प्रत्येक वाहनात एक पॅरामेडिक, एक सहाय्यक आणि एक प्रशिक्षित ड्रायव्हर असेल. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उच्च दर्जाची सेवा देता येईल.

नफा मिळवणे उद्देश्य नाही -

आमचे ध्येय नफा कमावणे हे नाही. परवडणारी आणि कार्यक्षम आपत्कालीन सेवा देण्यास आमचे प्राधान्य आहे. पुढील दोन वर्षांत हळूहळू आणखी अनेक शहरांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.

किती असणार शुल्क -

तुम्हाला @letsblinkit ॲपद्वारे बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका बुक करता येणार आहे. धिंडसा यांनी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधील एका फोटोत ही रुग्णवाहीका बुक केल्यानंतर रुग्णापर्यंत दहा मिनिटांत पोहचणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी बुकिंग चार्जेस दोन हजार रुपये असणार आहेत.

पेटीएम  संस्थापकाकडून अभिनंदन -

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ब्लिंकिटच्या नव्या सेवेचे कौतुक केले आहे. ते म्हणाला, "अभिनंदन एल्बी! अतिशय विचारपूर्वक डिझाइन केलेला प्रयोग. आशा आहे की, हे पूर्णपणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल आणि आणखी अनेक शहरांमधील रुग्णवाहिकांचा प्रश्न सुटेल.

ब्लिंकिटची मालकी झोमॅटोकडे -

सध्या ब्लिंकिट ची मालकी झोमॅटोकडे आहे. झोमॅटो हा ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. झोमॅटोने २०२१ मध्ये ब्लिंकिटचे अधिग्रहण केले होते. ब्लिंकिट पूर्वी ग्रोफर्स म्हणून ओळखला जात असे. १० मिनिटांत वस्तू वितरित करणाऱ्या  झेप्टो आणि इन्स्टामार्ट सारख्या  कंपन्यांशी ब्लिंकिंटची स्पर्धा आहे.

Whats_app_banner