उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नोएल (६७) हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.
रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ अखेर मिळाले आहे. ते एकदा टाटा सन्सचे चेअरमन होण्यापासून मुकले होते. मात्र, यावेळी त्यांची रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आणि ते टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष बनले आहेत.
आपल्या मेहनतीने नोएल टाटा यांनी टाटा समूहाला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $१.५ अब्ज (रु. १२,४५५ कोटी) असल्याचा अंदाज आहे.
प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपले काम करत राहणारे व्यक्ती म्हणून नोएल टाटा यांची ओळख आहे. नोएल टाटा यांचा जन्म १९५७ मध्ये नवल टाटा आणि सिमोन टाटा यांच्या पोटी झाला. त्यांनी यूकेमधील ससेक्स विद्यापीठातून बॅचलरची पदवी मिळवली आणि नंतर फ्रान्समधील जगातील आघाडीच्या बिझनेस स्कुलपैकी एक असलेल्या INSEAD मधील प्रतिष्ठित इंटरनॅशन एग्जीक्यूटिव्ह प्रोग्राममध्ये भाग घेतला.
यानंतर त्यांनी टाटा ग्रुपमधील टाटा इंटरनॅशनलमध्ये आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला. ही कंपनी टाटांचा विदेशातील व्यवसाय पाहते. जून १९९९ मध्ये त्यांना टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंटचे एमडी बनवण्यात आले. ही कंपनी मूळतः त्यांची आई सिमोन टाटा यांनी स्थापन केली होती.
ट्रेंटला मोठ्या उंचीवर नेण्याचे श्रेय नोएल टाटा यांना जाते. आज या कंपनीचे मार्केट कॅप २,९३,२७५.३८ कोटी रुपये आहे. यामुळे टाटा समूहातील नोएल यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढली. २००३ मध्ये ते टायटन इंडस्ट्रीज आणि व्होल्टासच्या बोर्डात रुजू झाले. २०१० मध्ये त्यांची टाटा इंटरनॅशनलचे एमडी म्हणून नियुक्ती झाली.
त्यानंतर अशी अटकळ बांधली जात होती की टाटा समूहाचे प्रमुख म्हणून रतन टाटा यांच्यानंतर त्यांना तयार केले जात आहे. पण २०११ मध्ये टाटा सन्सच्या बोर्डाने सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. सायरस मिस्त्री यांची बहीण आलू मिस्त्री यांचे लग्न नोएल टाटा यांच्याशी झाले आहे.
या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले पण नोएल यांनी शांतपणे आपले काम चालू ठेवले. २०१६ मध्ये मिस्त्री यांना चेअरमन पदावरून हटवण्यात आले आणि रतन टाटा काही काळासाठी अंतरिम चेअरमन म्हणून परतले. दरम्यान, एन चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष करण्यात आले.
नोएल यांची २०१८ मध्ये सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना आता टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. मात्र ते टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत.
याचे कारण म्हणजे २०२२ मध्ये टाटा सन्स बोर्डाने त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये एकमताने सुधारणा केली होती. त्यानुसार एकच व्यक्ती ही दोन पदे भूषवू शकत नाही. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे अध्यक्ष पद भूषवणारे शेवटचे व्यक्ती होते. म्हणजेच नोएल टाटा यापुढे टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. यासाठी त्यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.
नोएल आणि आलू यांना तीन मुले आहेत. माया, नेव्हिल आणि लेआ. नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा २०१६ मध्ये ट्रेंटमध्ये रुजू झाला आणि अलीकडेच स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये नोएल टाटा यांच्या मुलींचाही सहभाग आहे लेह टाटा (३९) यांना अलीकडेच इंडियन हॉटेल्सच्या गेटवे ब्रँडची जबाबदारी देण्यात आली होती. तर ३६ वर्षीय माया टाटा यांना विश्लेषण आणि तंत्रज्ञानामध्ये रस आहे. त्या टाटा डिजिटलमध्ये काम करतात.
संबंधित बातम्या