Noel Tata : टाटा समूहातील कंपन्यांची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी रतन नवल टाटा यांच्या जागी ६७ वर्षीय नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे.
टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेणारे व प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे उद्योगमहर्षी रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यानंतर टाटा समूहाच्या साम्राज्याची धुरा कोणाकडं जाणार याविषयी बरीच चर्चा होती. त्यासाठी अनेक नावं चर्चेत होती. त्यात नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनानंतर आज शोकसभा झाली. त्यानंतर टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळानं टाटांचीजागा नोएल टाटा घेतील, असं स्पष्ट करण्यात आलं.
टाटा सन्सची मालकी ट्रस्टच्या ६५.९ टक्के, टाटा समूहाच्या अर्धा डझन कंपन्यांची १२.८७ टक्के आणि मिस्त्री कुटुंबीयांची १८.४ टक्के आहे. टाटा ट्रस्टच्या बैठकीआधीच नोएल टाटा यांचं नाव उत्तराधिकारी पदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं.
टाटा ट्रस्टची स्थापना १८९२ मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. जमशेदजी टाटा हे नोएल आणि रतन यांचे आजोबा होता. टाटा समूहाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी टाटा ट्रस्टची स्थापना केली होती.