Business Ideas : कोणतेही काम उच्च-नीच नसते...
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : कोणतेही काम उच्च-नीच नसते...

Business Ideas : कोणतेही काम उच्च-नीच नसते...

HT Marathi Desk HT Marathi
Feb 29, 2024 06:47 PM IST

Business Ideas : व्यवसायात शिकलेला पहिला धडा म्हणजे काम केवळ काम असते, त्यात उच्च-नीच असा दर्जा नसतो आणि कोणताही धंदा हलका नसतो. भारतात जाती-धर्माच्या भेदभावामुळे आणि कामाची उच्च-नीचता ठरवण्याच्या चुकीच्या प्रथेमुळे खूपच सामाजिक नुकसान झाले आहे.

Business Ideas : No task or responsibility is insignificant or unimportant in business
Business Ideas : No task or responsibility is insignificant or unimportant in business

धनंजय दातार (व्यवस्थापकीय संचालक, अदिल ग्रूप)

दुबईतील आमचे दुकान म्हणजे भारतात गावोगावी आढळणाऱ्या ‘आगे दुकान, पिछे मकान’ रचनेचा नमुना होता. फक्त येथे दुकानाच्या मागच्या भागात घराऐवजी गोदाम होते आणि त्याच्या एका कोपऱ्यात स्टोव्ह, काही पातेली आणि अंथरुण-पांघरुण एवढ्या बाडबिस्ताऱ्यासह बाबा राहात होते. पहिल्या दिवशी त्यांनी आमच्या दोघांसाठी बेकरीतील तयार मिळणारा रोटीसारखा पाव (खुबूस), पातळ भाजी आणि भात असे जेवण बनवले. दुसऱ्या दिवसापासून स्वयंपाकाची जबाबदारी बाबांनी माझ्यावर सोपवली. हळूहळू झाडू-पोछा, लादी-सफाई, सामानाची ५० किलोची पोती पाठीवर वाहून नेणे, ड्रायव्हर नसेल तेव्हा टेंपो चालवणे आणि उधारी वसुलीसाठी दुबईत पायपीट करत हेलपाटे मारणे ही कामेही माझ्या गळ्यात पडली. मी बिनतक्रार कामे करत असलो तरी मनातून नाराज होतो. बाबा दुकानाचे मालक आणि मी त्यांचा मुलगा असताना नोकरांनी करायची हलकी-सलकी कामे ते माझ्याकडून का करुन घेत होते?

काही महिन्यांनी त्या चाकोरीला कंटाळून मी एक दिवस बाबांच्या रागाची पर्वा न करता त्यांना विचारले, 'बाबा! मी येथे व्यवसायाचे कौशल्य शिकायला आलो असताना माझा सगळा वेळ नोकरकामांत चालला आहे. तुम्हीही मला काही शिकवत नाही आहात.' फटकळ उत्तर ऐकण्याची तयारी असताना आश्चर्यकारकरीत्या बाबा शांतपणे म्हणाले, ‘दादा! मीसुद्धा आयुष्यात प्रथमच व्यवसाय करत असल्याने चुकत-ठेचकाळत शिकतो आहे. अनुभव नसताना मी तुला काय शिकवणार? तू दुकान चालवण्याचा अनुभव एखाद्या मोठ्या सुपर स्टोअरमध्ये उमेदवारी करुन घे. मी तशी व्यवस्था करतो.’

बाबांची व्यवसायामुळे दुबईच्या व्यापारी वर्तुळात ओळख होती. ती वापरुन त्यांनी मला एका सुपर स्टोअरमध्ये काम मिळवून दिले. ते काम म्हणजे ज्या विभागात माणसे कमी तेथे मदतीचे (हरकाम्या) होते. पण त्यातूनच मी निरीक्षणाने खूप शिकलो. हजारो वस्तूंची साठवण, वर्गवारी आणि मांडणी, ग्राहकांशी संवाद अशा गोष्टी उमगू लागल्या. इतर कामे मी बिनतक्रार करत असलो तरी एका कामाची मात्र किळस वाटायची. त्या स्टोअरमध्ये चिकन, गोमांस (बीफ) व वराहमांस (पोर्क) असे विविध प्रकारचे मांस विकले जाई. पॅकबंद असले तरी तेही हाताळण्याची मला किळस येई. घरच्या संस्कारामुळे मला विशेषतः गोमांस आणि वराहमांस हाताळणे नकोसे वाटे व मी त्या कामाला नकार द्यायचो.

लवकरच ही गोष्ट स्टोअर मालकाच्या कानावर गेली. एक दिवस त्याने मला बोलवून कारण विचारताच मी स्पष्टपणे सांगितले, ‘मला बीफ व पोर्क हाताळण्याची किळस वाटते.’ त्यावर मालक शांतपणे म्हणाला, ‘अरे! आम्ही तर पंजाबी जैन आहोत आणि घरी रोजच्या जेवणात अगदी कांदा, लसूणही खात नाही, पण म्हणून मी ते पदार्थ विकायचे नाहीत असे ठरवल्यास धंदा चालणार कसा? मालकाने धंद्यात वैयक्तिक आवडी-निवडी आणून चालत नाही कारण तेथे वैयक्तिक पसंती-नापसंतीपेक्षा ग्राहकांची गरज महत्त्वाची असते. तुलाही यशस्वी व्यावसायिक बनायचे असल्यास लक्षात ठेव, की कोणतेही काम उच्च-नीच नसते आणि कोणताही धंदा हलका नसतो.’ तो प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट ठरला.

त्या अनुभवी व्यावसायिकाच्या उपदेशामुळे माझे डोळे उघडलेच, पण बाबांच्या वागण्यामागचा गूढार्थही उमगला. बाबा माझ्यातून एक कुशल दुकानदार घडवू पाहात होते. मालकाचा मुलगा म्हणून माझ्या डोक्यात हवा जाऊ नये, याची काळजी ते घेत होते. उत्तम रांधता येत असुनही रोजचा स्वयंपाक त्यांनी माझ्यावर सोपवला कारण वेळ पडल्यास मी स्वतःचे जेवण स्वतः बनवू शकेन. झाडू-पोछा, लादी सफाई करायला लावण्यामागेही मला दुकानाचा कानाकोपरा ठाऊक व्हावा आणि कामाच्या ठिकाणाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, हा उद्देश होता. पोती वाहायला लावणे, टेम्पो चालवायला सांगणे आणि वसुलीला पाठवणे यामागे मला बारीक-सारीक कामांत तरबेज करण्याचा हेतू होता. बाबा शांतपणे मला पारखत होते. मी सुरवातीलाच ती कामे नाकारली असती तर आपला मुलगा व्यावसायिक होण्याच्या लायकीचा नाही, हे त्यांनी लगेच ओळखले असते. सुदैवाने मी संयमाने कष्ट करत राहिल्याने त्याची फळे मला मधुर मिळाली.

मित्रांनोऽ काम हे काम असून त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद नसतो, हे सत्य एकदा मनावर ठसले, की भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेल्या कर्मयोगाचा आपोआप प्रत्यय येतो. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।’ फळाची अपेक्षा न करता सततोद्योग केल्यानेच प्रगती आणि समृद्धी येते.

Whats_app_banner