MF kyc news : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! ‘या’ खात्यांसाठी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MF kyc news : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! ‘या’ खात्यांसाठी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही!

MF kyc news : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! ‘या’ खात्यांसाठी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही!

Updated Apr 01, 2024 11:20 AM IST

Mutual Fund KYC : म्युच्युअल फंड खात्यांच्या केवायसीच्या बाबतीत सीडीएसएलनं गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! ‘या’ खात्यांसाठी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही!
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! ‘या’ खात्यांसाठी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही!

Mutual Fund KYC relief news : म्युच्युअल फंडातील सध्याच्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आधीपासून घेतलेल्या म्युच्युअल फंडांच्या खात्यासाठी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही, असं सीडीएसएलनं (CDSL) स्पष्ट केलं आहे. हे गुंतवणूकदार कोणत्याही अडथळ्याशिवाय एसआयपी व इतर योजनांमध्ये गुंतवणूक सुरू ठेवू शकणार आहेत.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना आपलं खातं सुरू ठेवायचं असल्यास केवायसी सक्तीची आहे, असं याआधी सांगण्यात आलं होतं. त्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. तसं न केल्यास खातं निष्क्रिय होईल, असंही बजावण्यात आलं होतं. मात्र, केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सी सीडीएसएलनं अलीकडंच नवी माहिती दिली आहे. त्यानुसार, सरसकट सर्व गुंतवणूकदारांना केवायसी रेकॉर्ड अपडेट करण्याची गरज नाही. ज्यांनी नवीन म्युच्युअल फंड खाती उघडली आहेत, त्यांनाच केवायसी करावी लागेल. 

सीडीएसएलच्या सूचना काय?

ज्या गुंतवणूकदारांनी याआधी केवायसी केली असेल आणि त्यांचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी व इतर माहितीची वैध कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली गेली असेल, अशा गुंतवणूकदारांना या प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. मात्र, एखादी व्यक्ती पहिल्यांदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असेल किंवा आधीपासूनच म्युच्युअल फंडात गुंतवणूक असलेला एखादा गुंतवणूकदार नव्या फंडात गुंतवणूक करत असेल तर त्याला केवायसी प्रक्रियेतून जावं लागेल.

ही कागदपत्रे वैध असतील

अधिकृतपणे वैध कागदपत्रांमध्ये आधार कार्ड (Aadhaar Card), पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र यांचा समावेश होतो. केवायसीसाठी बँक स्टेटमेंट्स, वीज बिल आणि पाण्याची बिलं यापुढं वैध मानली जाणार नाहीत.

खाते होल्डवर असेल, बंद होणार नाही!

म्युच्युअल फंड योजनांमध्ये व्यवहार सुरू ठेवण्यासाठी सर्वच गुंतवणूकदारांना ३१ मार्चपर्यंत नवीन KYC करणं बंधनकारक नाही. जर एखादा गुंतवणूकदार नवीन केवायसी करू शकला नसेल, तरीही तो त्याच्या म्युच्युअल फंड खात्यात व्यवहार करू शकेल. त्याचं खातं ब्लॉक केलं जाणार नाही, परंतु काही काळासाठी होल्डवर ठेवलं जाईल. गुंतवणूकदारांनी त्यांचं केवायसी पुन्हा केल्यावर त्यांचं म्युच्युअल फंड खाते उघडले जाईल.

Whats_app_banner