असं का होतंय? एका शेअरवर २ शेअर मोफत देण्याची घोषणा करूनही सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  असं का होतंय? एका शेअरवर २ शेअर मोफत देण्याची घोषणा करूनही सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण

असं का होतंय? एका शेअरवर २ शेअर मोफत देण्याची घोषणा करूनही सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण

HT Marathi Desk HT Marathi
Nov 15, 2024 10:00 AM IST

NMDC Bonus Issue : बोनस शेअर्सची घोषणा केल्यानंतरही सरकारी कंपनीचे शेअर घसरत आहेत. पाहा किती झाला आहे भाव?

शेअर मध्ये घसरण
शेअर मध्ये घसरण

NMDC share price : सार्वजनिक क्षेत्रातील खाण कंपनी एनएमडीसीचे समभाग या आठवड्यात चर्चेत आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी हा शेअर २ टक्क्यांनी घसरून २१८.६४ रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. 

एमडीसीनं याच आठवड्यात २:१ या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. म्हणजेच प्रत्येक एका शेअरमागे कंपनीचे दोन शेअर्स अतिरिक्त मिळणार आहेत. गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच एनएमडीसी बोनस शेअर देत आहे. यापूर्वी या कंपनीनं सन २००८ मध्ये बोनस शेअर दिले होते, त्यावेळी देखील कंपनीनं प्रत्येक एका शेअरमागे दोन बोनस शेअर्स दिले होते.

तिमाही नफ्यात वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील खाण कंपनी एनएमडीसीचा चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा १६.६६ टक्क्यांनी वाढून १,१९५.६३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १०२४.८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न २२ टक्क्यांनी वाढून ५,२७९.६८ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ४,३३५.०२ कोटी रुपये होतं, असं एनएमडीसीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

काय करते ही कंपनी?

एनएमडीसी ही भारतातील सर्वात मोठे लोहखनिज खाण युनिट आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या पोलाद खात्याच्या अंतर्गत येते. पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या मागणीपैकी सुमारे २० टक्के मागणी ही कंपनी पूर्ण करते. कंपनीचं मार्केट कॅप ६४,१३६.३१ कोटी रुपये आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी भाव २८६.३५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव १६६.७० रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner