NMDC bonus issue news : नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात एनएमडीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बोनस शेअरवाटपाच्या योजनेवर चर्चा होणार आहे.
बोनस शेअर्स मिळण्याची शक्यता दिसताच शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. एनएमडीसी कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, आज हा शेअर ३.६० टक्क्यांनी वधारून २३४.७० रुपयांवर पोहोचला. व्यवहारादरम्यान या शेअरनं २३६.५० रुपयांचा उच्चांक गाठला. मे २०२४ मध्ये शेअरचा भाव २८६.३५ रुपयांवर पोहोचला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये शेअरचा भाव १५९.४५ रुपये होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.
एनएमडीसीनं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात कळवलं आहे. त्यानुसार, बोनस शेअर्स वाटपावर विचार करण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. गेल्या १६ वर्षांतील प्रथमच कंपनी बोनस देत आहे.
एनएमडीसीनं याआधी २००८ मध्ये बोनस शेअर्सचं वाटप केलं होतं. त्यावेळी कंपनीनं प्रत्येक एका शेअरसाठी २ बोनस शेअर्स जारी केले होते. तर, एनएमडीसीनं २०१६, २०१९ आणि २०२० मध्ये आपले इक्विटी शेअर्स परत खरेदी केले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात एनएमडीसीनं ४.०७ दशलक्ष टन लोखंडाचं उत्पादन केलं आणि ४.०३ दशलक्ष टन लोहखनिजाची विक्री केली. ऑक्टोबर महिन्यातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत उत्पादनात ३.८ टक्के आणि विक्रीत १७.१५ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीचं एकूण उत्पादन २१५.५ लाख टन आणि विक्री २३८.४ लाख टनांवर पोहोचली आहे.