National Hydroelectric Power Corporation : देशातील सर्वात मोठी हायड्रो पॉवर निर्मिती कंपनी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) च्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसत आहे. मागच्या वर्षभरात या शेअरमध्ये १०० टक्यांहून अधिक वाढ झाली आहे. मागच्या महिन्याभरातही हा शेअर ३६ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळं हा शेअर काढून नफा कमवावा की आणखी वाट पाहावी, अशा संभ्रमात गुंतवणूकदार आहेत. मार्केट एक्सपर्ट्सनी मात्र सबुरीचा सल्ला दिला आहे.
एखाद्या शेअरनं अल्पावधीत १०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले की अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल सुरू होते. मिळतंय त्यात समाधान मानावं की आणखी थांबावं अशी द्विधा मनस्थिती होते. एनएचपीसीच्या शेअरच्या बाबतीतही सध्या हेच चित्र आहे. अशा गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सनी आणखी वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. आत्ताच शेअर विकल्यास पुढं येणारी आणखी मोठी तेजी गमावून बसाल, असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.
NHPC चा शेअर आज ४ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत यात ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मार्केट एक्सपर्ट रवी सिंग यांच्या मते, हा शेअर पुढच्या तीन महिन्यांत सध्या किंमतीपेक्षा १५ टक्क्यांनी अधिक वाढू शकतो. म्हणजेच, हा शेअर १०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ७७ रुपयांच्या पातळीवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्लाही त्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) च्या समभागांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी हा शेअर ३७.८० रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. या किंमतीवरून तो ११ महिन्यांत १३७ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. आज ३० जानेवारी २०२४ रोजी या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. हा शेअर आज एनएसईवर ९२ रुपयांवर पोहोचला. एनएचपीसीचे डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल पुढील महिन्यात १२ फेब्रुवारी रोजी येणार आहेत. कंपनी लवकरच अंतरिम लाभांशाही जाहीर करणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या