अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून आयकर भरणाऱ्या पगारदार नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारने नव्या आयकर प्रणालीच्या संरचनेत बदल जाहीर केले आहे. या बदलानुसार ३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्तिला कोणताही आयकर भरावा लागणार नाही. नव्या कर रचनेचा पर्याय निवडलेल्या आयकर दात्यांनाच ही सूट मिळणार आहे. जुन्या कर रचनेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या बजेट भाषणात केलेल्या घोषणेनुसार नव्या कर रचनेचा पर्याय निवडलेल्या आणि वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना यापुढे कोणतेही कर भरावे लागणार नाही. पूर्वीसुद्धा ३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त होते.
तीन लाख रुपये ते सात लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आता उत्पन्नाच्या ५ टक्के आयकर भरावा लागणार आहे. (यापूर्वी ३ ते ६ लाख उत्पन्न असणाऱ्यांचा ५ टक्के स्लॅबमध्ये अंतर्भाव होता.)
सात लाख रुपये ते १० लाख रुपयांदरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना उत्पन्नाच्या १० टक्के आयकर भरावा लागणार आहे. (यापूर्वी ६ लाख ते ९ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा १० टक्के स्लॅबमध्ये अंतर्भाव होता.)
१० ते १२ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आता १५ टक्के आयकर भरावा लागणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषणात केली आहे. (यापूर्वी ९ लाख ते १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा १५ टक्के स्लॅबमध्ये अंतर्भाव होता.)
१२-१५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांन २० टक्के आयकर भरावा लागणारा आहे. गेल्यावर्षी जाहीर केलेल्या या टॅक्स स्लॅबमध्ये सरकारने कोणतेही बदल केलेले नाही.
१५ लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला ३० टक्के आयकर भरावा लागणार आहे. पूर्वी सुद्धा हे दर एवढेत होते. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.