गरीबीमुळे माझे पूर्वायुष्यात अनेकदा अपमान झाले आहेत. लहानपणी एका लग्नाच्या पंगतीतून मला एका गृहस्थांनी भरल्या ताटावरुन उठवले होते. तरुणपणात मुंबईत दारोदार फिनेल विकतानाही बरेचजण तुच्छतेने बोलून मला वाटेला लावत. अगदी व्यवसायात स्थिरावल्यावरही अपमान होणे चुकले नाही. वास्तविक मी छोटासा पण स्वावलंबी दुकानदार होतो, तरीही माझी सामाजिक प्रतिष्ठेची पातळी इतकी खाली होती, की सुरवातीच्या काळात मला कुणी घरगुती कार्यक्रमांसाठी किंवा अगदी मुलांच्या वाढदिवसालाही बोलवत नसे. मीसुद्धा ती अपेक्षा करत नसे. पुढे माझ्या व्यवसायानेच मला श्रीमंत बनवले, पण गरीबीची जाणीव आणि आई-बाबांच्या संस्काराचे फळ म्हणून मी कधीच माजलो नाही. पैशाच्या मस्तीने माजलेल्यांना लक्ष्मी कसा धडा शिकवते, याची अनेक उदाहरणे माझ्या डोळ्यापुढे राहिली.
दुबईतील एका श्रीमंत व्यापाऱ्याशी माझी व्यवसायानिमित्त थोडीफार ओळख होती. वास्तविक मला तो फारसा आवडायचा नाही, कारण त्याला असलेला श्रीमंतीचा प्रचंड माज. त्याच्या वागण्यात इतरांप्रती नेहमी तुच्छता, तर बोलण्यात जरब आणि वर्चस्व असे. हा माणूस एका सकाळी माझ्या दुकानात आला आणि त्याने मला फर्मावले, “अरे धनंजय! हे एक कागदपत्रांचे पाकिट मी तुझ्याकडे ठेऊन जातोय. माझा माणूस आज दुपारी येईल त्याला ते आठवणीने दे.” मला त्याचा तो हुकमी सूर आवडला नाही, पण मी गप्प राहिलो. अखेर तो बडा व्यापारी होता आणि मी एक छोटा दुकानदार. मी आपली होकारार्थी मान डोलवून ते पाकिट काऊंटरखालच्या कप्प्यात ठेवले. दिवसभर वाट बघूनही त्याचा माणूस काही पाकिट न्यायला आला नाही.
दुसऱ्या दिवशी अचानक मला कामानिमित्त अन्यत्र जावे लागले. नेमके माझ्या अनुपस्थितीत त्या व्यापाऱ्याचा माणूस पाकिट न्यायला येऊन गेला. माझ्या कर्मचाऱ्यांना त्याबाबत काहीच ठाऊक नसल्याने त्यांनी काही सांगण्यास असमर्थता व्यक्त केली. परिणामी हा व्यापारी पुढच्याच दिवशी संतापून आला आणि आवाज चढवून मला म्हणाला, “स्वतःला काय समजतोस? तुझा आणि तुझ्या दुकानाचा एवढासा जीव. माझ्या ताकदीचा तुला अंदाज नाही. मनात आणले तर तुझा धंदा बंद करीन.” मी शांत राहून दिलगिरी व्यक्त केली पण त्याच्या धमकावणीमुळे माझे कर्मचारी मात्र खवळले. ‘सरऽ चूक नसताना तुम्ही इतके अपमानास्पद का ऐकून घेतलेत?’, असे विचारु लागले. मी त्यांना समजावले, “बाबांनो! आपण येथे परमुलखात भांडणे नव्हे तर व्यवसाय करायला आलो आहोत. शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा पडते घेऊन वाद मिटवणे केव्हाही चांगले. त्याने अपमान केल्याने माझ्या अंगाला भोके पडली का? मला सवय आहे अशा बोलण्यांकडे दुर्लक्ष करण्याची. तुम्हीही नका मनावर घेऊ.” मी नंतर हा प्रसंग विसरुन गेलो.
त्यानंतर काही वर्षे लोटली. माझी कंपनी हळूहळू नेत्रदीपक प्रगती करु लागली. माझ्या उत्पादनांच्या उत्तम दर्जामुळे दुबईतील बड्या कंपन्या पुरवठ्यासाठी माझ्याकडे विचारणा करु लागल्या. अशाच एका चर्चेसाठी मी एका कंपनीच्या मालकाकडे गेलो होतो. चर्चा संपल्यावर त्या मालकाला कामासाठी बाहेर जायचे असल्याने त्याने आपल्या ड्रायव्हरला गाडी काढण्याचा निरोप पाठवला आणि आम्ही बरोबरच कार्यालयाबाहेर पडलो. गाडीशेजारी उभ्या ड्रायव्हरने आपल्या मालकासाठी अदबीने गाडीचे दार उघडले. ड्रायव्हरशी नजरानजर होताच मला आश्चर्याचा धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी माझ्या दुकानात येऊन माझा धंदा संपवण्याची भाषा करणारा तो श्रीमंत माणूस या कंपनीच्या मालकाकडे चक्क ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो माझी नजर टाळून घाई-गडबडीने निघून गेला, पण मी मात्र कुतूहलामुळे अस्वस्थ झालो होतो.
या प्रकारामागील रहस्य शोधण्याचा मी निश्चय केला. चौकशीअंती असे समजले, की त्या उर्मट व्यापाऱ्याला मध्यंतरीच्या काळात इतके प्रचंड नुकसान झाले होते, की त्याचे वैभव पार धुवून निघाले होते. त्याचा स्वभाव इतरांना दुखावण्याचा असल्याने व्यापारी वर्तुळातील कुणीही त्याच्या अडचणीला धावून गेले नाही. अखेर कफल्लक होऊन तो चरितार्थासाठी ओळख लपवून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. त्याच्या आवाजातील ती जरब संपून तेथे लाचारी आली होती. कालगती मोठी विचित्र असते, हेच खरे. एक सुभाषित आहे.
तानीन्द्रियाणि सकलानि तदेव कर्म। सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव।
अर्थोष्मणा विरहितः पुरुषः स एव। अन्यक्षणे न भवतीति विचित्रमेतत्॥
(अर्थ – तीच इंद्रिये, तेच कर्म, तीच कुशाग्र बुद्धी, तेच बोलणे, पण एक पैशाचा उबारा नसेल, की तोच माणूस क्षणात वेगळा भासू लागतो)
(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)