Success Mantra : नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क रॅन्डॉल्फ यांनी स्वत:ची पहिली नोकरी सुरू करण्याआधी वडिलांनी हातानं लिहून त्यांना दिलेलं एक पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पत्रात रॅन्डॉल्फ यांच्या वडिलांनी यशाचे सात नियम सांगितले आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी हे सात नियम पाळावे असा सल्ला वडिलांनी रॅन्डॉल्फ यांना दिला होता. हे पत्र त्यांनी आता सार्वजनिक केलं आहे.
पत्र शेअर करताना रॅन्डॉल्फ यांनी आपल्या बालपणीच्या काही आठवणीही शेअर केल्या आहेत. ‘मी एकवीस वर्षांचा होतो. कॉलेजमधून नुकताच बाहेर पडत होतो आणि माझी पहिली नोकरी सुरू करणार होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी मला सूचनांची हस्तलिखित यादी दिली होती, असं मार्क रँडॉल्फ यांनी 'एक्स’वर लिहिलं आहे.
> एखादी गोष्ट जेवढी करायला सांगितली गेलीय, त्यापेक्षा ती किमान १० टक्के तरी जास्त करा.
> आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल कधीही कोणालाही काही सांगू नका. आपल्याला माहीत नसलेली गोष्ट खरी असल्याचं भासवू नका. याबाबतीत खूप काळजी घ्या आणि शिस्त पाळा.
> नेहमी जमिनीवर पाय ठेवून राहा. विनम्रतेनं व आपुलकीनं वागा.
> केवळ करायची म्हणून तक्रार करू नका. टीका करायचीच असेल तर ती रचनात्मक आणि गंभीरपणे करा.
> तुम्हाला एखाद्या गोष्टीची पुरेपूर माहिती असेल तर निर्णय घेण्यास अजिबात घाबरू नका.
> शक्य असेल तिथं मूल्यमानप करा.
> मन खुलं ठेवा. नव्या गोष्टींचा स्वीकार करा, पण ते करताना सजग राहा.
> तत्पर राहा!
१ जून रोजी शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला ६१,८०० हून अधिक व्ह्यूज मिळाले असून ही संख्या अजूनही वाढतच आहे. अनेकांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्येही आपले विचार मांडले.
लोकांनी या मुद्द्यांवर काय प्रतिक्रिया दिल्या पाहा:
हे नियम खूपच उपयुक्त आहेत. 'तुम्हाला सांगितलं जातं त्यापेक्षा किमान १० टक्के जास्त करा', हे मला आवडलं असं एका व्यक्तीनं म्हटलं आहे.
‘उत्कृष्ट यादी’ असं दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे.
आई-बाबा होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकानं आपल्या मुलांना द्यावयाची यादी तयार करावी, असा नियम असावा. ग्रेट बाबा!, असं तिसऱ्या एका व्यक्तीनं म्हटलं आहे.
'तुमच्या वडिलांनी दिलेली नियमांची यादी म्हणजे आम्हा सर्वांच्या प्रौढत्वाची चीट शीट आहे असं वाटतंय, असं एकानं म्हटलं आहे.
जबरदस्त! हातानं लिहिलेली चिठ्ठी शेअर करण्याची कल्पना आवडली. मुलं कॉलेजला जात असताना असंच काहीतरी करावं लागेल,' असं पाचव्यानं म्हटलं आहे.
धीस इज ग्रेट, असं एकानं म्हटलं आहे.