Neelam Leinen IPO : आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. येत्या आठवड्यात आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. हा आयपीओ नीलम लिनन अँड गारमेंट्स (इंडिया) लिमिटेडचा आहे. हा इश्यू ८ नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि १२ नोव्हेंबरला बंद होईल.
सॉफ्ट होम फर्निशिंग कंपनीनं आपल्या आयपीओसाठी २० ते २४ रुपये दरपट्टा निश्चित केला आहे. १३ कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये एकूण ५४.१८ लाख इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. यात कुठल्याही ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश नाही.
आयपीओमधून उभारल्या जाणाऱ्या निधीचा वापर भरतकाम मशीन खरेदी, काही प्रमाणात कर्जाची परतफेड आणि इतर व्यावसायिक कामांसाठी व भांडवली खर्चासाठी केला जाणार आहे. एक्स्पर्ट ग्लोबल कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे लीड मॅनेजर आहेत, तर पूर्वा शेअररजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहेत.
किरकोळ गुंतवणूकदार कमीतकमी एका लॉट आकारासाठी अर्ज करू शकतात, यात १,४४,००० रुपये किंमतीच्या ६,००० समभागांचा समावेश आहे. उच्च नेटवर्थ असलेल्या व्यक्तींसाठी कमीत कमी लॉट आकार दोन आहे, ज्याची किंमत २,८८,००० रुपये आहे. आयपीओचा अर्धा भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. कंपनीच्या समभागांचे वाटप १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नीलम लिनन्स अँड गारमेंट्सचा आयपीओ १८ नोव्हेंबर रोजी एनएसई एसएमई प्लॅटफॉर्म इमर्जवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र स्थित नीलम लिनन अँड गारमेंट्स आयपीओ ही सॉफ्ट होम फर्निशिंग फर्म आहे. ही कंपनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA), ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये आपली सेवा पुरवते. किरकोळ दुकानांसाठी बेडशीट, ड्युवेट कव्हर, उशी कव्हर, टॉवेल, डोहर, रग, शर्ट आणि कपडे तयार करण्याचे काम कंपनी करते.