Stock Market Updates : बांधकाम कंपनी एनसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर एनसीसीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३१८ रुपयांवर पोहोचला. मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.
केन-बेतवा लिंक प्रकल्प प्राधिकरणाकडून ३३८९.४९ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याचं एनसीसी लिमिटेडनं जाहीर केलं आहे. एनसीसी लिमिटेडचे समभाग या वर्षी आतापर्यंत ८७ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.
केन-बेतवा लिंक प्रकल्पातील दौधन धरणाच्या ईपीसी अंमलबजावणीसाठी कंपनीची यशस्वी निविदाकार म्हणून निवड झाल्याचं पत्र केन-बेतवा लिंक प्रकल्प प्राधिकरणाकडून २८ नोव्हेंबर २०२४ रोजी स्वीकृती पत्र (LOI) प्राप्त झालं आहे. कंत्राटाच्या अटींनुसार ईपीसी तत्त्वावर नियोजन, डिझाइनिंग, अभियांत्रिकी आणि हायड्रो-मेकॅनिकल कामांची जबाबदारी कंपनीवर असेल. हा प्रकल्प ७२ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असं एनसीसी लिमिटेडनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलं आहे.
गेल्या वर्षभरात एनसीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये ९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी बांधकाम कंपनीचा शेअर १६५.५० रुपयांवर होता. तो आज ३१८ रुपयांवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत जवळपास ८७ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत एनसीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये ४२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३६४.५० रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर १५४.७० रुपये आहे.
ऑक्टोबरमध्ये त्यांना ३४९६ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत, असं एनसीसी लिमिटेडनं (NCC) यावर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. त्यानुसार, कंपनीच्या इमारत विभागाला २६८४ कोटी रुपयांच्या, विद्युत विभागाला ५३८ कोटी, तर पाणी व इतर विभागाला २७४ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ४७६० कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या.