Crorepati Stock : देशातील सर्वात महागड्या शेअरनं पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. मागील आठवड्यात तब्बल ७० हजार रुपयांपर्यंत घसरल्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या शेअरमध्ये प्रचंड वाढ दिसून आली. अल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअरला आज ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. हा शेअर २८२६३१.३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
मागील आठवड्यात हा शेअर २६९१७२.७० रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच आज एका दिवसात त्यात १३,४५८ रुपयांची वाढ झाली आहे. २९ ऑक्टोबरपासून या शेअरमध्ये आठवडाभर सातत्यानं तेजी दिसून आली. या दरम्यान हा शेअर ३३२,३९९.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर गेल्या आठवड्यात सलग चार सत्रात शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली होती. या दरम्यान हा शेअर सुमारे ७० हजार रुपयांपर्यंत घसरला होता.
अल्सिड इन्व्हेस्टमेंट्सनं गेल्या आठवड्यात सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४३.४७ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत १७९.३७ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचा महसूल १४९.६२ टक्क्यांनी वाढून ५६.३४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १५.५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि २२.५७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. या तिमाहीत कंपनीचे लाभांश उत्पन्न १९.४७ टक्क्यांनी वाढून २.२७ कोटी रुपये झाले आहे. त्याचे व्याज उत्पन्न ५७.३५ टक्क्यांनी वाढून ७.२७ लाख रुपये झाले.
अल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही गुंतवणूक कंपनी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) नोंदणीकृत नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) म्हणून ही कंपनी कार्यरत आहे. एशियन पेंट्समध्ये एल्सिडचा २.८३ टक्के हिस्सा आहे. २९ ऑक्टोबर रोजी अल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या शेअरनं २,३६,२५० रुपयांचा भाव गाठला. शेअरची लिस्टिंग किंमत २,२५,००० रुपये होती. स्पेशल कॉल लिलावापूर्वी हा शेअर बीएसईवर २१ जून २०२४ रोजी ३.५३ रुपयांवर बंद झाला होता.