share market news today : एखादी छोटीशी बातमी देखील शेअर मार्केटमध्ये कशी उलथापालथ घडवू शकते ते नवरत्न कंपनी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडच्या शेअरनं आज पुन्हा दाखवून दिलं. एनबीसीसीच्या संचालक मंडळानं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याचे संकेत दिले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम शेअरच्या किंमतीवर झाले. हा शेअर आज ८ टक्क्यांहून अधिक वाढून १९२.४० रुपयांवर पोहोचला.
येत्या ३१ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कंपनीचं संचालक मंडळ बोनस शेअर देण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे, अशी माहिती एनबीसीसीनं स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. हा शेअर मंगळवारी १७७.६५ रुपयांवर बंद झाला होता. आज तो आणखी उसळला.
बोनस शेअर देण्याची एनबीसीसीची ही दुसरी वेळ आहे. याआधी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडनं फेब्रुवारी २०१७ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर दिला होता. याशिवाय, आता कंपनीनं डिविडंड देण्याचीही घोषणा केली आहे. प्रति शेअर ६३ पैसे अंतिम लाभांश दिला जाणार आहे. ६ सप्टेंबर २०२४ ही त्यासाठी रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचं बाजार भांडवल ३४,००० कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे.
गेल्या वर्षभरात एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडच्या शेअरमध्ये २७३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २८ ऑगस्ट २०२३ रोजी नवरत्न कंपनीचा शेअर ५०.८५ रुपयांवर होता. तोच शेअर आज, २८ ऑगस्ट २०२४ रोजी १८५ रुपयांच्याही पुढं गेला आहे. या वर्षी आतापर्यंत एनबीसीसीच्या शेअरमध्ये १३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी एनबीसीसीचा शेअर ८१.८५ रुपयांवर होता. २८ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर १९२.६० रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९८.३० रुपये आहे. तर, ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४९ रुपये आहे.
संबंधित बातम्या