Stock Market news in Marathi : सरकारी बांधकाम कंपनी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडला ३१६ कोटी रुपयांचं नवं कंत्राट मिळालं आहे. ओडिशा सरकारनं हे कंत्राट दिलं आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांच्या नजरा एनबीसीसीच्या शेअरकडं वळल्या आहेत. कंपनीच्या शेअर्सची किंमत अजूनही १०० रुपयांपेक्षा कमी आहे.
एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडला ओडिशातील विविध ठिकाणी असलेल्या प्राथमिक शाळेच्या वसतिगृहांचे अद्ययावतीकरण करावं लागणार आहे. याशिवाय, राजस्थान राज्य औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळाकडून कंपनीला २०२ कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं आहे.
सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १२५.१० कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ८१.९० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ५२.८० टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडचा महसूल २४८५.७० कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल २०८५.५० कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात १९.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडचा शेअर आज बीएसईवर ९४.७९ रुपयांवर उघडला. बीएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव २ टक्क्यांनी वाढून ९६.८० रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १२४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी २ वर्षे हा शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत २५० टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीत सरकारचा ६१ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.