Natco Pharma Dividend News : आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत मोठा तोटा झाल्यामुळं नॅटको फार्माच्या शेअरमध्ये तब्बल १९ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तिमाही निकालांसह कंपनीनं डिविडंड जाहीर केला होता. मात्र, डिविडंडची घोषणा गुंतवणूकदारांना शेअर विक्रीपासून थांबवू शकलेली नसल्याचं दिसत आहे.
नॅटको फार्मा कंपनीनं बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर तिमाही निकाल जाहीर केले. त्यानुसार, कंपनीचा निव्वळ नफा 37.75 टक्क्यांनी कमी होऊन १३२.४ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हा नफा २१२.७० कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत नॅटको फार्माचं कामकाजातून एकत्रित उत्पन्न ३७.४ टक्क्यांनी घटून ४७४.८ कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ७५८.६ कोटी रुपये होतं. व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशन (EBITDA) पूर्वीचं उत्पन्न डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत ८५.५ टक्क्यांनी घसरून ३८.८ कोटी रुपयांवर आलं आहे. परिणामी, कंपनीचं एबिटडा मार्जिन ३८.३ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत घसरलं आहे.
तिमाही निकालाच्या घोषणेनंतर बीएसईवर नॅटको फार्माच्या शेअरची किंमत १८.९५ टक्क्यांनी घसरून ९८६ रुपये प्रति शेअर झाली. हा शेअर घसरणीसह उघडला, पण काही तोटा भरून काढत सकाळी १० च्या सुमारास १७ टक्क्यांच्या घसरणीसह १,००८.६५ रुपयांवर व्यवहार केला. दुपारी १ वाजल्यानंतर पुन्हा घसरण वाढली आहे.
गेल्या वर्षभरात नॅटको फार्माच्या शेअरमध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. मात्र, अलीकडच्या काळात शेअरना आव्हानांचा सामना करावा लागला आहे. कंपनीचे शेअर्स एका महिन्यात १७ टक्के आणि सहा महिन्यांत ३२ टक्क्यांनी घसरले आहेत.
नॅटको फार्माच्या संचालक मंडळानं आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रत्येक इक्विटी शेअरमागे १.५० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश देण्याच्या उद्देशानं पात्र असलेल्या भागधारकांची नोंद घेण्याची तारीख मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी २०२५ पासून अंतरिम लाभांश देण्यास सुरुवात होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
'नॅटको फार्मा'च्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. कंपनीला मुख्य उत्पन्न देणाऱ्या रेव्लिमिडच्या अनुपस्थितीमुळं निर्यात फॉर्म्युलेशन व्यवसायात घसरण झाली आहे. देशांतर्गत फॉर्म्युलेशन विक्रीलाही मंदीचा सामना करावा लागला, ज्याचा परिणाम एकूण कामगिरीवर झाला. असं असलं तरी ही कंपनी फार्मा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. पुढील पाच वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण उत्पादनं लॉन्च करण्याची योजना कंपनीनं आखली आहे. या लाँचिंगमुळं आर्थिक वर्ष २०२६ पासून महसूल, नफा आणि परताव्याच्या गुणोत्तरात लक्षणीय सुधारणा होऊन विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज स्टोक्सबॉक्सचे संशोधन विश्लेषक प्रथमेश मासडेकर यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या