NR Narayana Murthy on AI : एआय अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सचा (AI) जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झाल्यापासून मानवी भवितव्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रात माणसासमोर कशी आव्हानं निर्माण करू शकते यावर मंथन सुरू आहे. शेकडो माणसाची कामं एकट्यानं करण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानामुळं नोकऱ्यांवर कसा परिणाम होईल याचीही चिंता सर्वांना लागून राहिली आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.
बेंगळुरू इथं 'मनी कंट्रोल'ला दिलेल्या मुलाखतीत एआयच्या संभाव्य परिणामांबाबत बोलताना नारायणमूर्ती यांनी लोकांच्या मनातील भीती काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवंतानं निर्माण केलेली सर्वात शक्तिशाली गोष्ट जीवसृष्टीत कोणती असेल तर ते मानवी मन आहे. हे सांगताना त्यांनी १९७५ मधील 'केस टूल्स' या तंत्रज्ञानाचं उदाहरण दिलं. हे तंत्रज्ञान सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या नोकऱ्या खाऊन टाकेल असं म्हटलं जात होतं. मात्र, तसं घडले नाही, याकडं मूर्ती यांनी लक्ष वेधलं.
‘केस टूल्स आणि प्रोग्रॅम जनरेटरच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला तेव्हा माणसानं त्यापुढचा विचार सुरू केला. ‘हे तंत्रज्ञान जे करू शकणार नाही अशा अधिक मोठ्या अडचणी व अधिक गुंतागुंतीच्या समस्यांवर आम्हाला लक्ष केंद्रीत करता येईल असा दृष्टीकोन इंजिनीअर्सनी ठेवला,' असं ते म्हणाले.
कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) नोकऱ्या संपवून टाकेल ही भीती अनाठायी व अतिरंजित आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती नोकऱ्या खाऊन टाकणार आहे यावर चर्चा न होता, हे तंत्रज्ञान मनुष्यबळात किती योगदान देऊ शकतं यावर झाली पाहिजे. एआयचं स्वागत केलं पाहिजे, हे तंत्रज्ञान नियंत्रणात ठेवलं पाहिजे आणि एक ठोस, उपयुक्त साधन म्हणून ते वापरलं गेलं पाहिजे, असं मूर्ती म्हणाले.
'कोणत्याही क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल, खासकरून आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल मी प्रचंड आशावादी आहे. मात्र, हे करताना तंत्रज्ञानाच्या चाव्या आपल्या हाती ठेवून त्याला आपलं सहाय्यक साधन म्हणून वापरण्याची हुशारी आपल्याला दाखवावी लागेल, असं मूर्ती यांनी सांगितलं.
एआयमुळं रोजगाराच्या संधींवर परिणाम होणार नाही हे सांगण्याची नारायणमूर्ती यांची पहिलीच वेळ नाही. याआधी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (AIMA) ६७ व्या स्थापना दिनी बोलताना त्यांनी हेच विचार मांडले होते. एआयसारख्या तंत्रज्ञानामुळं जीवन सुखकर होईल आणि मनुष्य कधीही तंत्रज्ञानाला आपला ताबा घेऊ देणार नाही. मानवी मन तंत्रज्ञानापेक्षा एक पाऊल पुढे आहे, असं ते म्हणाले होते.