कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील ७० तास काम करायला हवे, या 'इन्फोसिस'चे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वादानंतर नारायण मूर्ती यांनी प्रथमच या विषयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. 'तुम्ही हे करा किंवा करू नये, असं कुणीही कुणाला बोलू शकत नाही. कुणी किती तास काम करावे ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब असून तो सार्वजनिक चर्चेचा विषय असू नये.' असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं. मुंबईत किलाचंद स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. तरुणांनी आठवड्यातील ७० तास काम करायला हवे, असं वक्तव्य नारायण मूर्ती यांनी गेल्या वर्षी केलं होतं. या वक्तव्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरीच चर्चा झाली होती. उद्योग क्षेत्रातील अनेक अधिकाऱ्यांनी मूर्ती यांच्या या विधानावर आपले मत व्यक्त केले आहे.
‘इन्फोसिस’ या सॉफ्टवेअर कंपनीची उभारणी करताना ते दिवसातून किती तास काम करायचे, याबाबत नारायण मूर्ती यांनी यावेळी माहिती दिली. ‘मी सकाळी ६.२० वाजता ऑफिसला जायचो आणि रात्री ८.३० वाजता घरी परतायचो. गेली ४० वर्षे मी हे काम करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते चुकीचे आहे, असे कोणीही म्हणू शकत नाही,’ असं नारायण मूर्ती म्हणाले.
मूर्ती पुढे म्हणाले, ‘कामाच्या तासांची ही निवड प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक निवड असते. त्यावर सार्वजनिक चर्चा होऊ नये. कारण चर्चा करावी असे हे मुद्दे नाहीत. या मुद्दावर कुणी आत्मपरीक्षण करू शकतो, आत्मसात करू शकतो आणि एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो आणि ज्यांना जे हवे ते करू शकतो’ असे नारायण मूर्ती म्हणाले.
लार्सन अँड टुब्रोचे (एल अँड टी) चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम यांनी आणखी पुढे जात ९० तासांच्या कार्यसप्ताहाबद्दल मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
‘मी रविवारी काम करतो. परंतु तुम्हाला रविवारी काम करायला सांगू शकत नाही, याची खंत वाटते. जर मी तुम्हाला रविवारी सुद्धा काम करायला सांगू शकलो तर मला त्याचा अधिक आनंद होईल.’ असं सुब्रमण्यम यांनी त्यांच्या ९० तासांच्या वर्कवीकचे समर्थन करताना सांगितले होते.
आठवड्यातून ७० तास काम करण्याबाबत नारायण मूर्ती आणि नंतर सुब्रमण्यम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जगभरातील उद्योगजगतातील अधिकाऱ्यांनी या ‘कॉर्पोरेट कल्चर’वर आपले मत व्यक्त केले होते.
अदानी उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. एका व्यक्तीची कार्यपद्धती दुसऱ्यावर लादण्याची चूक टाळणे कसे महत्त्वाचे आहे असं अदानी म्हणाले होते.
संबंधित बातम्या