Nalco Share Price : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडच्या (नाल्को) नं सोमवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली. कंपनीनं डिविडंडची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये आज बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत.
कंपनीच्या संचालक मंडळानं १० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दुसऱ्या अंतरिम लाभांशाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार शेअरहोल्डर्सना प्रत्येक शेअरवर ४ रुपये मिळणार आहेत. हा लाभांश देण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. लाभांशाची रक्कम सर्व पात्र भागधारकांना १० मार्च २०२५ रोजी किंवा त्याआधी दिली जातील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
तिमाही निकाल आणि डिविडंडच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर नाल्कोच्या शेअरचा भाव आज सकाळच्या सत्रात वधारला, मात्र त्यानंतर त्यात घसरण झाली. आता ११.२८ वाजता हा शेअर ०.७० टक्क्यांनी घसरून १८९.७१ रुपयांवर ट्रेड करत आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत नाल्कोचा निव्वळ नफा ३ पटीनं वाढला आहे, तर महसुलात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांगले विक्री उत्पन्न, अनुकूल बाजारपेठेची मागणी आणि प्रभावी खर्च व्यवस्थापन या वाढीला कारणीभूत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १,५८३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ४८८ कोटी रुपये होता. नाल्कोनं आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण ४,७६१ कोटी रुपयांचं उत्पन्न नोंदवलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ३,३९८ कोटी रुपये होतं.
डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांत परिचालनातून निव्वळ नफा आणि महसूल अनुक्रमे ३२४६ कोटी रुपये आणि ११,५२० कोटी रुपये झाला. ही वाढ अनुक्रमे २११ टक्के आणि २० टक्के इतकी आहे.
नाल्कोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, कंपनीच्या यशासाठी प्रक्रिया क्षमतेत सुधारणा, खर्चात कपात आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढविणं महत्वाचं आहे. चालू तिमाहीच्या निकालासाठी अॅल्युमिना अँड मेटलमधील चांगली विक्री वसुली, अॅल्युमिनाच्या विक्रीचं वाढलेलं प्रमाण, कॅप्टिव्ह कोळशाचा वापर आणि कच्च्या मालाचा कमी खर्च हे प्रामुख्यानं जबाबदार होते.
आता रिफायनरीचा विस्तार, पोट्टंगी खाणी कार्यान्वित करणं, स्मेल्टर प्लांटचा ब्राऊनफिल्ड विस्तार आणि नियोजित सीपीपी विस्तार यासह विस्तारकामे लवकर पूर्ण करण्यावर कंपनीचा भर आहे, असंही सिंह यांनी नमूद केलं.
संबंधित बातम्या