Dividend Stock : नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडला (Nalco) दुसऱ्या तिमाहीत छप्परफाड नफा झाला आहे. या नफ्यानंतर कंपनीनं डिविडंड जाहीर करत शेअरहोल्डर्सना खूष करून टाकलं आहे. या डिविडंडसाठी रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली आहे.
नाल्कोच्या नफ्यात सप्टेंबर २०२४ तिमाहीत ४१५ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला १०६२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. नाल्कोनं मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत २०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत नाल्कोचं एकूण उत्पन्न ३२ टक्क्यांनी वाढून ४००१ कोटी रुपये झालं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीचं एकूण उत्पन्न ३०४४ कोटी रुपये होते.
नाल्कोनं आपल्या भागधारकांसाठी अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. सरकारी कंपनीनं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ४ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. त्यासाठी २९ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, या तारखेला डिमॅट खात्यात शेअर असणारे गुंतवणूकदार डिविडंडसाठी पात्र ठरणार आहेत.
नाल्कोच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात १४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ९३.८१ रुपयांवर होता. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २३०.७५ रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत नाल्कोच्या शेअरमध्ये ६७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर १३६.१० रुपयांवर होता. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २३०.७५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २४८ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ९०.१० रुपये आहे. आज देखील बीएसईवर नाल्कोचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून २३०.७५ रुपयांवर पोहोचला.