Share Market News : शेअर बाजार नकारात्मक वाटचाल करत असतानाही वॉल्यूम ट्रेडिंगच्या जोरावर बुधवारी बीएसईवर नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर तब्बल १७ टक्क्यांनी वधारून १०६.४० रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. लघु व मध्यम उद्योग (SME) कंपनीचे शेअर्स सलग पाचव्या दिवशी तेजीत आहेत. लिस्टिंगनंतरच्या अवघ्या १० दिवसात हा शेअर २०० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
गेल्या महिन्यात नॅकडॅक कंपनीचा आयपीओ आला होता. शेअरची इश्यू प्राइस ३५ रुपये निश्चित करण्यात आली होती. २४ डिसेंबर रोजी हा शेअर ९० टक्के प्रीमियमसह ६६.५० रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगनंतरच्या १० दिवसांत नॅकडॅक इन्फ्राचे शेअर्स ३५ रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या तुलनेत २०४ टक्क्यांनी वधारले आहेत. बीएसई एसएमईवर कंपनीची सुरुवात ६९.८२ रुपयांवर झाली आणि लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. हा आयपीओ २००० पेक्षा जास्त पट सब्सक्राइब झाला होता.
कंपनीने भारत सरकार आणि उत्तराखंड राज्य सरकारच्या विविध विभागांचे अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. गेल्या काही वर्षांत सुमारे ९६ कोटी ७५ लाख रुपयांचे ६३ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत कंपनीची ऑर्डर बुक ८८.३३ कोटी रुपये होती. एक्सचेंजवर उपलब्ध शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, २० डिसेंबर २०२४ पर्यंत कंपनीतील ३०.१६ टक्के पब्लिक शेअरहोल्डिंगपैकी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कंपनीत ९.४६ टक्के हिस्सा होता, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ४.९४ टक्के होता. नॅकडॅक इन्फ्रामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा १४.८१ टक्के हिस्सा होता.
संबंधित बातम्या