Mutual Fund : निफ्टी ५०० इंडेक्स म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक का करावी?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund : निफ्टी ५०० इंडेक्स म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक का करावी?

Mutual Fund : निफ्टी ५०० इंडेक्स म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक का करावी?

Updated Jul 16, 2024 03:32 PM IST

Nifty 500 Index Fund : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी निफ्टी ५०० इंडेक्स फंडाचा नवा पर्याय आला आहे. काय असतो हा इंडेक्स आणि त्याचे फायदे काय? जाणून घेऊया…

Mutual Fund : निफ्टी ५०० इंडेक्स म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक का करावी?
Mutual Fund : निफ्टी ५०० इंडेक्स म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक का करावी? (Pixabay)

Mutual Fund : अ‍ॅक्सिस निफ्टी ५०० इंडेक्स फंड लाँच झाल्यामुळं ओपन-एंडेड इंडेक्स फंडात स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या निमित्तानं निफ्टी ५०० फंडाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. वैविध्यपूर्ण शेअर्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्मिती हे या फंडाचं उद्दिष्ट आहे.

निफ्टी ५०० इंडेक्स फंड राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) सूचीबद्ध असलेल्या भारतातील टॉप ५०० कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवतो. या कंपन्या बाजार भांडवल आणि व्यापारी उलाढालीच्या आधारे निवडल्या जातात. बाजार भांडवलावर आधारित कंपन्यांचे तीन प्रकार पडतात. निफ्टी ५०० इंडेक्समध्ये या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांचासमावेश असतो. बाजार भांडवलावर आधारित इंडेक्सची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.

लार्ज कॅप्स : या भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रस्थापित कंपन्या आहेत. निफ्टी ५०० इंडेक्समध्ये या कंपन्यांचा वाटा सर्वाधिक ७४.५ टक्के आहे.

मिड कॅप्स : या कंपन्या मध्यम आकाराच्या असतात. ज्यात वाढीची क्षमता असते. निफ्टी ५०० इंडेक्समध्ये या कंपन्यांचा वाटा १६.६ टक्के आहे.

स्मॉल कॅप्स: या कंपन्या आकाराने लहान असतात. त्या वेगानं वाढण्याची शक्यता असते. मात्र, त्यात जोखीमही जास्त असते. निफ्टी ५०० इंडेक्समध्ये त्यांचा वाटा सुमारे ८.९% इतका आहे.

निफ्टी ५०० इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्यास कोणाला फायदा होऊ शकतो?

निफ्टी ५०० इंडेक्स फंड विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करतो. यात खालील गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदार: चढ-उतार होत असला तरी दीर्घकाळात शेअर बाजार नेहमीच वरच्या दिशेनं जातो. पाच वर्षांहून अधिक कालावधीत बाजारातील अस्थिरतेवर मात करून अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा फायदा करून देतो. हे माहीत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी निफ्टी ५०० इंडेक्स फायदेशीर ठरतो.

विविध्यपूर्ण पोर्टफोलिओला महत्त्व देणारे गुंतवणूकदार: निफ्टी ५०० इंडेक्स विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय देतो. हे वैविध्य जोखीम कमी करण्यास मदत करते. याद्वारे एका क्षेत्रातील घसरण दुसऱ्या क्षेत्रातील वाढीद्वारे संतुलित केली जाऊ शकते.

निष्क्रिय गुंतवणूकदार : निफ्टी ५०० सारखे इंडेक्स फंड निष्क्रियपणे व्यवस्थापित केले जातात आणि इंडेक्सच्या कामगिरीचं प्रतिबिंब दर्शवतात. ज्यांना स्वत: सक्रिय राहून शेअर निवडायचे नाहीत किंवा बाजाराला वेळ देऊ इच्छा नाही, अशांसाठी हा फंड उपयुक्त आहे.

मध्यम जोखीम घेणारे गुंतवणूकदार : निफ्टी ५०० इंडेक्समध्ये मोठ्या, मध्यम आणि स्मॉल-कॅप कंपन्यांचा समावेश असतो. यामुळं वाढीच्या संधी उपलब्ध होत असल्या, तरी केवळ लार्ज कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित केलेल्या फंडांच्या तुलनेत यात काही प्रमाणात जोखीम असते. तेवढी जोखीम घेणाऱ्यांसाठी हा फंड चांगला आहे.

निफ्टी ५०० इंडेक्समधील गुंतवणूक कशामुळे फायदेशीर ठरते?

निफ्टी ५०० इंडेक्स गुंतवणूकदारांना अनेक फायदे देतो. त्यामुळं हा एक आकर्षक पर्याय आहे.

विस्तृत बाजार कव्हरेज : निफ्टी ५० इंडेक्स फक्त पहिल्या ५० कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो, तर निफ्टी ५०० सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलाच्या जवळजवळ ९३ टक्के कंपन्यांना कवेत घेतो. त्यामुळं गुंतवणूकदाराला लार्ज कॅपबरोबर मध्यम व छोट्या आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येते.

वैविध्य : ५०० कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केल्यानं जोखीम संतुलित होण्यास मदत होते. कोणत्याही एका कंपनीच्या कामगिरीचा आपल्या एकूण पोर्टफोलिओवर होणारा परिणाम कमी होतो.

निफ्टी ५० वर मात : प्रदीर्घ काळात निफ्टी ५०० इंडेक्सनं निफ्टी ५० निर्देशांकाला मागे टाकण्याची क्षमता दर्शविली आहे. लहान कंपन्यांच्या वेगावान प्रगतीमुळं हे अनेकदा घडतं.

वाढीव जोखीम-परतावा प्रोफाइल : निफ्टी ५०० निर्देशांक संभाव्य जोखीम आणि परतावा यांच्यात अधिक अनुकूल समतोल राखतो. निफ्टी ५० च्या तुलनेत यात थोडी जास्त अस्थिरता असली तरी उत्तम परताव्याची शक्यताही असते.

वैविध्यपूर्ण क्षेत्रात विस्तार : निफ्टी ५०० इंडेक्स विविध क्षेत्रांना व्यापतो. यामुळं गुंतवणूकदारांना संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेतील विकासाच्या संधींचा लाभ घेता येऊ शकतो. गुंतवणूकदारांचा विस्तार केवळ मोठ्या कंपन्यांच्या क्षेत्रापुरता राहत नाही.

दीर्घकालीन संपत्ती वाढीची संधी : निफ्टी ५०० इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा (SIP) वापर करतात. एसआयपीमुळं खर्चाची सरासरी साधली जाते. कालांतरानं प्रति युनिट खर्च कमी होतो आणि त्यामुळं दीर्घकालीन संपत्ती वाढण्याची शक्यता असते.

शेअर बाजारात नेहमी जोखीम असते आणि भूतकाळात भरपूर नफा झाला म्हणून तो भविष्यात होईल याची खात्री देता येत नाही. मात्र, निफ्टी ५०० इंडेक्स भारताच्या वैविध्यपूर्ण विकासाची फळे चाखण्याची एक उत्तम संधी देतो.

 

(डिस्क्लेमर : ही केवळ म्युच्युअल फंडाची माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner