मराठी बातम्या  /  बिझनेस  /  mutual fund : निवडणूक निकालांचा म्युच्युअल फंडांना मोठा फटका, ९० हजार कोटी बुडाले

mutual fund : निवडणूक निकालांचा म्युच्युअल फंडांना मोठा फटका, ९० हजार कोटी बुडाले

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 05, 2024 05:33 PM IST

election results impact on mutual fund : लोकसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याचा मोठा फटका शेअर बाजाराला व पर्यायानं म्युच्युअल फंडांना बसला आहे.

निवडणूक निकालांचा म्युच्युअल फंडांना मोठा फटका, ९० हजार कोटी बुडाले
निवडणूक निकालांचा म्युच्युअल फंडांना मोठा फटका, ९० हजार कोटी बुडाले

election results impact on mutual fund : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे तीव्र पडसाद काल, ४ जून रोजी शेअर बाजारात उमटले. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गडगडला. या घसरणीमुळं सरकारी कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली. म्युच्युअल फंडही झटक्यातून सुटले नाही. त्यांचे तब्बल ९० हजार कोटी रुपयांचं मोठं नुकसान झालं.

ट्रेंडिंग न्यूज

म्युच्युअल फंडांची सरकारी कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. निकालाच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजेच, ३ जूनपर्यंत म्युच्युअल फंडांकडं ८४ सरकारी कंपन्यांचे ५.७१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स होते. निवडणुकीच्या निकालानंतर हे मूल्य ४.८३ लाख कोटी रुपयांवर आलं.

कोणत्या कंपनीत किती हिस्सा?

४ जून पर्यंत म्युच्युअल फंड (MFs) कंपन्यांची स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक होती. त्यानंतर एनटीपीसी लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांचा समावेश आहे. निकालाच्या आदल्या दिवशीपर्यंत स्टेट बँकेचे ९०,४४० कोटी रुपयांचे शेअर्स म्युच्युअल फंडांकडं होते. ४ जून रोजीच्या निकालानंतर ही गुंतवणूक १३०४० कोटी रुपयांनी घटून ७७,४०० कोटी रुपयांवर आली. NTPC मध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक ५८१५७ कोटी होती. ती १०६२५ कोटी रुपयांनी कमी झाली.

‘या’ शेअर्सना तोटा

पॉवर ग्रिड कॉर्प (रु. ३१,१३६ कोटी), कोल इंडिया (रु. २९,४२० कोटी), पॉवर फायनान्स कॉर्प (रु. २२,४३० कोटी), REC (१८,३९० कोटी) आणि ओएनजीसी (रु. १८,९५५ कोटी) च्या शेअरमधील घसरणीमुळंही म्युच्युअल फंडांना फटका बसला आहे. या कंपन्यांमधील म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीचं मूल्य अनुक्रमे ८,२७५ कोटी, ४,४०० कोटी, ४,६६५ कोटी, ४५०० कोटी आणि ५४९० कोटी रुपयांनी घटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या सरकारी कंपन्यांना गेल्या दोन दिवसांत एकत्रितपणे सुमारे १० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यांचं एकूण बाजार भांडवल ५५ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

मार्केट एक्सपर्ट काय म्हणतात…

ब्रोकरेज प्रभुदास लिलाधर फर्मचे सल्लागार प्रमुख विक्रम कासट म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समधील तेजी काही काळापुरता कमी होऊ शकते, परंतु ते पुन्हा लवकरच मूळ पदावर येतील. नव्या निकालानंतर सामाजिक सुधारणांच्या वेगावर परिणाम होऊ शकतो, परंतु नवीन सरकार आपला अजेंडा कसा पुढं नेतं यावर बरंच काही अवलंबून आहे. अनिश्चिततेमुळं सुरुवातीला शंका असू शकतात, परंतु नवीन सरकारच्या स्थापनेनंतर आणि त्याच्या धोरणांच्या अंमलबजावणीनंतर महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी दिसू शकतात.'

WhatsApp channel