मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Index Fund : इंडेक्स फंड म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? या फंडात गुंतवणुकीचे फायदे काय?

Index Fund : इंडेक्स फंड म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? या फंडात गुंतवणुकीचे फायदे काय?

Jul 05, 2024 03:39 PM IST

what is Index Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुमचा गोंधळ उडत असेल तर इंडेक्स फंडबद्दल जाणून घ्या! गुंतवणूक होईल सोपी!

इंडेक्स फंड म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? या फंडात गुंतवणुकीचे फायदे काय?
इंडेक्स फंड म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? या फंडात गुंतवणुकीचे फायदे काय?

Index Fund Explainer : कमीत कमी जोखीम घेऊन आणि तज्ज्ञांची मदत घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा एक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. या म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार पडतात. यापैकी सर्वात जुना आणि लोकप्रिय असा प्रकार म्हणजे इंडेक्स म्युच्युअल फंड. काय असतो हा प्रकार? काय आहेत त्याचे फायदे? जाणून घेऊया सविस्तर

इंडेक्स फंड या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. हा फंड भारतीय शेअर बाजारातील राष्ट्रीय व मुंबई शेअर बाजाराची प्रतिकृती असते. ज्या प्रमाणात निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये वाढ होते, त्या प्रमाणात संबंधित फंड प्रगती करतो. या प्रकारातील फंड निष्क्रिय (Passive) मानला जातो. कारण, यात म्युच्युअल फंड मॅनेजर स्वत: कुठलेही शेअर निवडत नाही. तर, बीएसई किंवा एनएसईतील कंपन्यांमध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक करतो.

ट्रेंडिंग न्यूज

इंडेक्स फंड विविध क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळं भांडवली मूल्य असलेल्या समभागांमध्ये गुंतवणूक करून समतोल साधतात. यामुळं गुंतवणुकदारांची इक्विटी गुंतवणुकीतील जोखीम कमी होते. इंडेक्स फंड हे वैविध्यपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

इंडेक्स फंड म्हणजे काय?

इंडेक्स फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड किंवा एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) आहे ज्याची रचना विशिष्ट वित्तीय बाजार निर्देशांकाच्या कामगिरीचं प्रतिबिंब दाखवण्यासाठी केली जाते. स्टॉक्स किंवा सिक्युरिटीज निवडण्यासाठी फंड व्यवस्थापकांच्या कौशल्यावर अवलंबून न राहता इंडेक्स फंड्स निर्देशांकाच्या एकूण कार्यक्षमतेचं प्रतिबिंब दर्शवतो. हे निर्देशांक बाजाराच्या विविध विभागांचं प्रतिनिधित्व करू शकतात. त्यात लार्ज-कॅप स्टॉक, स्मॉल-कॅप स्टॉक, विशिष्ट उद्योग किंवा अगदी संपूर्ण बाजाराचा समावेश असतो.

इंडेक्स फंड कसे कार्य करतात?

इंडेक्स फंड हे इंडेक्समधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्यांच्या बाजार भांडवलाच्या प्रमाणात गुंतवणूक करतात, ज्यावर ते नियमित लक्ष ठेवून असतात. उदाहरणार्थ, एखादा इंडेक्स फंड निफ्टी ५० इंडेक्सचा अभ्यास करत असेल तर तो निफ्टी ५० चा समावेश असलेल्या ५० समभागांमध्ये समान प्रमाण राखून गुंतवणूक करतो.

इंडेक्स फंडाच्या परताव्यात संबंधित इंडेक्समधील बदलानुसार चढ-उतार होत असतो. त्यामुळं वेळोवेळी स्टॉक निवडण्याची गरज राहत नाही व ट्रेडिंगचा खर्चही आपोआप कमी होतो.

रोजच्या रोज मॅनेज कराव्या लागणाऱ्या अ‍ॅक्टिव्ह फंडांच्या तुलनेत इंडेक्स फंड सामान्यत: अधिक किफायतशीर असतात.

इंडेक्स फंडांचे प्रकार

भारतातील गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या इंडेक्स फंडांचे पर्याय आहेत. ते पुढीलप्रमाणे…

ब्रॉड मार्केट इंडेक्स फंड : बाजार भांडवलाच्या प्रमाणात व वेगवेगळ्या प्रदेशातील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक

घटक आधारित किंवा स्मार्ट बीटा इंडेक्स फंड: गुणवत्ता आणि कामगिरी अशा निकषांवर आधारित स्टॉक्समध्ये गुंतवणूक. वाढीव परतावा मिळण्याची शक्यता.

मार्केट कॅपिटलायझेशन इंडेक्स फंड: स्टॉक मॅनेजरची बारीक नजर असलेल्या इंडेक्समधील कंपन्यांच्या बाजार मूल्यावर आधारित गुंतवणूक

इक्वल वेटेज इंडेक्स फंड : पोर्टफोलिओमधील प्रत्येक स्टॉकमध्ये समान गुंतवणूक. समतोल गुंतवणुकीला प्राधान्य

डेट इंडेक्स फंड: डेट इंडेक्समध्ये गुंतवणूक. गुंतवणुकीवर कमीत कमी खर्च.

सेक्टर आधारित इंडेक्स फंड: बँकिंग किंवा तंत्रज्ञानासारख्या विशिष्ट उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक. संबंधित क्षेत्रातील सखोल ज्ञान आवश्यक.

कस्टम इंडेक्स फंड: वैयक्तिकृत पोर्टफोलिओ व्यवस्थापनास मुभा.

इंडेक्स फंडांचे फायदे

इंडेक्स फंड हे तुलनेने व्यापक असतात. संपूर्ण बाजाराला कवेत घेतात. हे फंड सक्रियपणे मॅनेज करण्याची गरज नसल्यानं खर्च (Expense Ratio) कमी असतो. त्यामुळं हे फंड अनेकदा इतर प्रकारातील फंडापेक्षा जास्त परतावा देतात.

गुंतवणूकदार इंडेक्स फंडांना पसंती का देतात?

इंडेक्स म्युच्युअल फंड त्यांच्या किफायतशीरतेसाठी ओळखले जातात. सक्रियपणे मॅनेज केलेल्या फंडाच्या तुलनेत यात जोखीम आणि खर्च दोन्ही कमी असतात.

इंडेक्स फंडांतील गुंतवणुकीसाठी आर्थिक कौशल्य किंवा स्टॉक निवडीचा अभ्यास असण्याची गरज नसते. ते कोणालाही गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतात.

इंडेक्स फंड गुंतवणुकीचे विविध पर्याय देखील देतात. गुंतवणूकदार स्टॉक इंडेक्स फंड आणि बाँड इंडेक्स फंड हे दोन्ही पर्याय घेऊ शकतात. याशिवाय विशिष्ट मार्केट सेक्शन्सना लक्ष्य करणारे विशेष निर्देशांक फंडही उपलब्ध आहेत.

इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही. वर्षाला फक्त तुम्हाला काही मिनिटं किंवा काही तास द्यावे लागतात.

इंडेक्स फंडांच्या परताव्यावर इतर फंडांच्या तुलनेत कमी कर लागतो. सक्रियपणे मॅनेज करावे लागत नसल्यानं या फंडातील गुंतवणूक सर्वसाधारणपणे दीर्घकाळ ठेवली जाते. त्यामुळं कर आपोआपच कमी होतो.

 

(डिस्क्लेमर : हा लेख केवळ माहितीपर आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांशी चर्चा करा.)

WhatsApp channel