motilal oswal nifty india defence index fund : मोतीलाल ओसवाल या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीनं मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड लॉन्च केला आहे. हा डिफेन्स इंडेक्स फंड काल, १३ जूनपासून लाँच झाला असून २४ जून २०२४ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. हा एक ओपन-एंडेड फंड असून निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सच्या परताव्याचं प्रतिबिंब यात पडणार आहे.
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडानं दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही या NFO मध्ये किमान ५०० रुपये आणि नंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. संरक्षण क्षेत्रात एकत्रित गुंतवणुकीची संधी देणारा मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड हा भारतातील पहिला इंडेक्स फंड आहे. या फंडाचा बेंचमार्क इंडेक्स निफ्टी इंडिया डिफेन्स TRI आहे. स्वप्नील पी मयेकर आणि राकेश शेट्टी हे या डिफेन्स इंडेक्स इंडिया फंडाचे मॅनेजर आहेत.
मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या मते, ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवली वाढ हवी आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सची रचना संरक्षण प्रकल्पांच्या निर्मिती आणि सर्व्हिसिंगमध्ये गुंतलेल्या संरक्षण कंपन्यांची कामगिरी प्रतिबिंबित करण्यासाठी करण्यात आली आहे. या इंडेक्स फंडात १५ कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या निफ्टीचा भाग आहेत.
भारतातील सूचीबद्ध डिफेन्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारा हा भारतातील पहिला इंडेक्स फंड आहे. संरक्षण क्षेत्राच्या विकासात सहभागी होण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळवून देणं हा या इंडेक्स फंडचा उद्देश आहे.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारतानं वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळं या क्षेत्रात वाढीला व नवसंशोधनाला मोठा वाव आहे. पुढील सहा वर्षांत संरक्षण क्षेत्रात अंदाजित १०० ते १२० अब्ज डॉलर विस्ताराची शक्यता असून त्याचा लाभ उठवण्याचं मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडाचं लक्ष्य आहे. संरक्षणावर मोठा खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. त्यामुळं देशांतर्गत संरक्षण कंपन्यांसाठी भरीव संधी उपलब्ध आहेत. हा फंड संरक्षण तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या भक्कम प्रगतीचा लाभ घेण्यास सज्ज आहे, असं मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ प्रतीक अग्रवाल सांगितलं.
(डिस्क्लेमर : वरील लेखात केवळ NFO ची माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराशी चर्चा करा.)
संबंधित बातम्या