Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी सध्या अनेक पर्याय आहेत. त्यामुळं अनेकदा गुंतवणूकदारांचा गोंधळ उडतो. मात्र, थोडा वेळ देऊन अभ्यास केला व गुंतवणूक तज्ज्ञांची मदत घेतली तर आपल्याला योग्य पर्याय निवडता येतो. सध्याच्या घडीला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर सेक्टोरल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
थीम्ड सेक्टोरल फंडात गुंतवणूक करण्याची संधी आहे. पॉवर, इन्फ्रा, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्व्होकेशन आणि कंझम्पशन थीममधील गुंतवणूक लक्षणीय परतावा देऊ शकते.
निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा फंडाच्या उदाहरणानं हे समजून घेता येईल. या फंडानं गेल्या वर्षभरात ८२.७३ टक्के परतावा दिला आहे. निप्पॉन इंडियाच्या फार्मा आणि कंझम्पशन फंडांनी देखील अनुक्रमे ४०.९२ टक्के आणि ३९.३४ टक्के परतावा दिला आहे. निप्पॉन इंडिया इनोव्हेशन फंडानं १० महिन्यांत ४७.९२ टक्के, तर निप्पॉन इंडिया बँकिंग फंडानं २५.९५ टक्के परतावा दिला आहे. याच सेगमेंटमध्ये आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि आदित्य बिर्ला यांच्या सेक्टोरल फंडांनीही गुंतवणुकीवर दोन अंकी परतावा दिला आहे.
प्रमुख क्षेत्रातील फंडांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडांनी ४६.०५ टक्के, कंझम्पशन फंडांनी ४७ टक्के, फार्मा फंडांनी ४७.०६ टक्के आणि तंत्रज्ञानावर आधारित फंडांनी ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात सेक्टोरल फंडांनी गुंतवणुकीवर ४४.४० टक्के परतावा दिला आहे.
धोरणात्मक दृष्ट्या तयार केलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना क्षेत्रनिहाय वाढीचा फायदा होतो, शिवाय भारताच्या भक्कम आर्थिक विकासातही हातभार लावता येतो. वेल्थवॉल्ट रिसर्च अँड अॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे विकास भट्टू म्हणतात की, गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना सर्व प्रमुख सेक्टोरल फंडांमध्ये चांगला परतावा मिळाला आहे. सरकारचे धोरणात्मक उपक्रम आणि निर्देशांकाची आश्वासक वाटचाल पाहता, आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणं आणि पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा आणि इनोव्हेशन फंडांमध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे. अर्थात, हे आपल्या नॉन-कोअर पोर्टफोलिओचा भाग असू शकतात.
संबंधित बातम्या