
Dhruva Capital Services Stock : कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या स्टॉक्सची शेअर बाजारात प्रचंड चर्चा असते. अशीच चर्चा सध्या ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या वित्तीय क्षेत्रातील कंपनीच्या शेअरची आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना मागच्या तीन वर्षांत ५९०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
ध्रुव कॅपिटलच्या शेअरची मागील तीन वर्षांतील घोडदौड खूपच सुखावणारी आहे. डिसेंबर २०२० मध्ये हा शेअर ३.५ रुपयांवर होता. तो आज २१० रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. नफ्याचा हिशेब मांडायचा झाल्यास डिसेंबर २०२० मध्ये या पेनी स्टॉकमध्ये ज्यांनी १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल व आजही ती कायम असेल तर, त्यांच्या गुंतवणुकीचं आजचं मूल्य ६ लाख रुपये असेल.
मागच्या एका वर्षात या शेअरनं तब्बल ८८९ टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर, चालू वर्षात आतापर्यंत हा शेअर ७९७ टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे, २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात हा शेअर स्थिर होता. चार महिने तो नकारात्मक होता. उरलेल्या सात महिन्यात त्यानं दोन अंकी परतावा दिला आहे.
जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तो जवळपास ९० टक्क्यांनी वाढला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यात ६३ टक्क्यांची वाढ झाली. नोव्हेंबर आणि एप्रिलमध्ये ५३ टक्के तर चालू महिन्यात आतापर्यंत तो ४५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जुलै आणि जूनमध्ये अनुक्रमे २१.५ टक्के आणि २६ टक्के वाढला. मे, ऑक्टोबर, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांत शेअरमध्ये घट झाली होती.
आज या शेअरनं २१०.०५ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. २८ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या २१.२५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून तो ८८९ टक्क्यांनी वाढला आहे.
गेल्या काही तिमाहीत कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाल्यामुळं शेअर वधारला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २४.२ लाख रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत तो २.६ लाख रुपये होता. कंपनीचं एकूण उत्पन्न सप्टेंबरच्या तिमाहीत २८.५ लाख रुपयांवर पोहोचलं आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ते ६.२ लाख रुपये होतं.
ध्रुवा कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड ही बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून कार्यरत आहे. १९९४ साली स्थापन झालेल्या या कंपनीचं मुख्यालय उदयपूरमध्ये असून कंपनी अर्थविषयक आणि गुंतवणूक विषयक सेवा देते.
(डिस्क्लेमर : या लेखात केवळ कंपनीच्या कामगिरीची व शेअरच्या भावाची माहिती देण्यात आलेली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठी जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या
