Multibagger Stock : मर्क्युरी ईव्ही-टेक कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांसाठी कोटी मोलाचा ठरला आहे. या शेअरनं पाच वर्षांत तब्बल २३ हजार टक्के परतावा दिला असून या कालावधीत गुंतवणूकदारांना अक्षरश: करोडपती बनवलं आहे.
मागच्या पाच वर्षांत मर्क्युरी ईव्ही टेकचा शेअर ३६ पैशांवरून सध्याच्या ८६ रुपयांपर्यंत आला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती रक्कम आज वाढून दोन कोटी रुपये झाली असती.
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये या शेअरनं १३०० टक्के परतावा दिला, त्यानंतर पुढील कॅलेंडर वर्षात ८९७ टक्क्यांचा भरघोस परतावा झाला. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत १३९.२० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ६४.३२ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १६०१ कोटी रुपये आहे.
मर्क्युरी ईव्ही टेक ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनं आणि इतर संबंधित अक्षय ऊर्जा उत्पादनांच्या उत्पादन आणि व्यवसायात सक्रिय आहे. ही कंपनी केवळ वाहनंच तयार करत नाही तर बॅटरी, चेसिस आणि मोटर कंट्रोलर सारख्या महत्त्वपूर्ण घटकांची निर्मिती करते. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये दुचाकींपासून ते बस, लोडर आणि प्रवासी वाहनांपर्यंतच्या उत्पादनांचा समावेश आहे. त्यातून वाहतुकीच्या विविध गरजा पूर्ण होतात. कंपनीची उपकंपनी डीसी २ मर्क्युरी कार्स प्रायव्हेट लिमिटेडनं अलीकडेच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (BMGE) २०२५ मध्ये भाग घेतला. तिथं कंपनीनं त्यांची दोन उत्पादनं सादर केली. याव्यतिरिक्त, कंपनीनं बॅटरीवर चालणारी थ्री डब्ल्यू ई-रिक्षा एल ५ (७ सीटर) सादर केली. ही ई-रिक्षा कंपनीच्या नव्या नियामक फायलिंगनुसार युरोपियन मानकांनुसार डिझाइन केली गेली आहे.
आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला १.६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील कामकाजातून मिळालेला महसूल १९.४८ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत तो ५.५२ कोटी रुपये होता.
संबंधित बातम्या