रेल्वेकडून कंपनीला मिळालं २००० कोटींचं कंत्राट; ५ दिवसांत २८ टक्क्यांनी वाढला शेअर, तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रेल्वेकडून कंपनीला मिळालं २००० कोटींचं कंत्राट; ५ दिवसांत २८ टक्क्यांनी वाढला शेअर, तुमच्याकडं आहे का?

रेल्वेकडून कंपनीला मिळालं २००० कोटींचं कंत्राट; ५ दिवसांत २८ टक्क्यांनी वाढला शेअर, तुमच्याकडं आहे का?

Dec 12, 2024 05:26 PM IST

Kernex Microsystems Share Price : केर्नेक्स मायक्रोसिस्टीम्सचा शेअर सध्या जोरदार तेजीत असून २००० कोटींचं कंत्राट मिळाल्यानंतर या शेअरनं उच्चांक गाठला आहे.

रेल्वेकडून 'या' कंपनीला मिळालं तब्बल २००० कोटींचं कंत्राट; ५ दिवसांत २८ टक्क्यांनी वाढला शेअर
रेल्वेकडून 'या' कंपनीला मिळालं तब्बल २००० कोटींचं कंत्राट; ५ दिवसांत २८ टक्क्यांनी वाढला शेअर

Stock Market News Today : मागच्या सलग चार दिवसांपासून तेजीत असलेल्या केर्नेक्स मायक्रोसिस्टीम्सच्या शेअरला आज, गुरुवारी अप्पर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअरचा भाव ५ टक्क्यांनी वाढून १३८५.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स सध्या उच्चांकी पातळीवर आहेत. गेल्या ५ सत्रांत कंपनीच्या शेअर्समध्ये २८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

केर्नेक्स मायक्रोसिस्टीम्सच्या शेअरमध्ये तेजी येण्यामागचं कारण कंपनीला मिळालेलं कंत्राट आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कंपनीकडून केर्नेक्सला २०४१.०४ कोटी रुपयांचं काम मिळालं आहे.

कंपनीनं ६ डिसेंबर रोजी याबाबतची माहिती दिली होती. केर्नेक्स मायक्रोसिस्टीम्स ही कंपनी रेल्वेसाठी सुरक्षा प्रणाली आणि सॉफ्टवेअर सेवांची निर्मिती आणि विक्री करते. हैदराबाद आणि इजिप्तमध्ये कंपनीचे कारखाने आहेत.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी कशी होती?

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीची कामगिरी शानदार राहिली आहे. कर भरल्यानंतर कंपनीला ६.८१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा ३.५७ कोटी होता. तर गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ४.५३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ४१२.१९ कोटी रुपये होता.

शेअर बाजारात कंपनीची एकूण कामगिरी कशी?

गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २८७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर पोझिशनल गुंतवणूकदारांना २ वर्षात ३५५ टक्के परतावा देण्यात हा शेअर यशस्वी ठरला आहे. गेल्या ३ वर्षांत या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १५२० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १३८५.८० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३३३.५५ रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner