मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 16, 2024 03:25 PM IST

HG Infra Engineering Share Price : एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग या कंपनीचे शेअर मागच्या दोन वर्षांत १६३ टक्के आणि चार वर्षांत ७२७ टक्क्यांनी वधारले आहेत. एप्रिलमध्ये या शेअरनं मासिक वाढीचा उच्चांक नोंदवला आहे.

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला
Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला (Pixabay)

Multibagger Stock : पायाभूत सेवासुविधा क्षेत्रातील एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांत सातत्यानं तेजी दिसून आली आहे. इंजिनीअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) सेवेत गुंतलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन वर्षांत १६३ टक्के आणि अवघ्या चार वर्षांत ७२७ टक्के वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मागील महिन्यात अर्थात एप्रिलमध्ये या शेअरनं तीन वर्षांतील सर्वात मोठी मासिक वाढ नोंदवली आहे. या महिन्यात शेअरमध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू मे महिन्यात देखील ही वाढ कायम राहिली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरनं पहिल्यांदाच १४०० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि १४१७.९५ रुपये प्रति शेअरचा उच्चांक गाठला.

मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न ११.२ टक्क्यांनी वाढून १,६३५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. या तिमाहीत निव्वळ नफा १६० कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत हाच नफा १४८ कोटी रुपये होता.

नफ्यात मोठी वाढ

संपूर्ण आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२४) कंपनीचा परिचालनातून (Operating Revenue) मिळणारा महसूल १५.९ टक्क्यांनी वाढून ५,१२१ कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ नफा ४२१ कोटी रुपयांवरून ५४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

व्यवस्थापनानं आर्थिक वर्ष २०२५ साठी १५ ते २० टक्के महसूल वाढ आणि १५ ते १६ टक्के एबिटडा मार्जिनचं लक्ष्य ठेवलं आहे. अपेक्षित महसुली वाढ प्रामुख्यानं सध्या चालू असलेल्या प्रकल्पांमधून होईल. नव्या ऑर्डरमधून कंपनीला आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ११ ते १२ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. निवडणुकांनंतर गती वाढण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ऑर्डर बुक 12,434 कोटी रुपये आहे. २०२४ च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीनं रेल्वे, सौर आणि रस्ते विभागात एकूण ४,३५० कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळवल्या. विशेष म्हणजे, या ऑर्डर बुकमध्ये आता बदल झाला आहे. आता बुकमध्ये रस्ते ६८ टक्के तर, रस्ते / मेट्रो आणि सौर ऑर्डर बुकमध्ये अनुक्रमे २१ टक्के आणि १० टक्के आहेत.

महसूल वाढीचं लक्ष्य साधणार

ऑर्डर आवक ८ हजार कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टापेक्षा कमी झाली असली तरी सध्याच्या ऑर्डर इनफ्लोमुळं आर्थिक वर्ष २०२५ साठी १५ ते २० टक्के महसूल वाढीचं लक्ष्य साध्य होईल, असं देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्चनं म्हटलं आहे.

एचएएम प्रकल्पांसाठी कंपनीनं आतापर्यंत ६९४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अतिरिक्त ५०५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उर्वरित २६२ कोटी रुपये आणि २०२७ मध्ये समप्रमाणात गुंतविण्याची योजना आहे. अंतर्गत उत्पन्नातून इक्विटीची गरज भागविणं अपेक्षित आहे.

ब्रोकरेज कंपनीनं १,४४५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही टार्गेट प्राइस शेअरसाठी नवीन उच्चांकी पातळी दर्शवते.

 

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली मतं आणि शिफारशी वैयक्तिक विश्लेषकांच्या आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी याच्याशी सहमत असेलच असं नाही. हा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel