अचानक असं काय झालं? महिनाभरात ६५ टक्क्यांनी वाढलेला रिलायन्स पॉवरचा शेअर आज का आपटला?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अचानक असं काय झालं? महिनाभरात ६५ टक्क्यांनी वाढलेला रिलायन्स पॉवरचा शेअर आज का आपटला?

अचानक असं काय झालं? महिनाभरात ६५ टक्क्यांनी वाढलेला रिलायन्स पॉवरचा शेअर आज का आपटला?

Published Oct 04, 2024 02:05 PM IST

Reliance Power Share Price : एक महिन्यात ६५ टक्के आणि वर्षभरात १७० टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या रिलायन्स पॉवरचे शेअर आज धाडकन कोसळले आहेत.

अचानक असं काय झालं? महिनाभरात ८० टक्क्यांनी वाढलेला रिलायन्स पॉवरचा शेअर आज का आपटला?
अचानक असं काय झालं? महिनाभरात ८० टक्क्यांनी वाढलेला रिलायन्स पॉवरचा शेअर आज का आपटला? (MINT_PRINT)

Stock Market Updates Today : मागील महिनाभरात जवळपास ६५ टक्क्यांनी वधारलेला अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरचा भाव आज अचानक कोसळला आणि या शेअरला पाच टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. त्यामुळं गुंतवणूकदार काहीसे संभ्रमात पडले आहेत.

रिलायन्स पॉवरच्या शेअरचा भाव शुक्रवारी बीएसईवर ५४.२५ रुपयांवर खुला झाला. काल बंद झालेल्या ५३.६५ रुपये किंमतीपेक्षा हा भाव १ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. त्यानंतर शेअरचा भाव ५ टक्क्यांनी घसरून बीएसईवर ५०.९७ रुपयांवर पोहोचला. एनएसईवरही रिलायन्स पॉवरच्या शेअरचा भाव ५ टक्क्यांनी घसरून ५०.९५ रुपयांवर बंद झाला. रिलायन्स पॉवरच्या शेअरचा भाव गुरुवारीच एनएसईवर १ वर्षातील उच्चांकी ५३.६० रुपयांवर पोहोचला होता.

रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये वर्षभरात १७० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. आज शेअर पडला असला तरी मागील महिनाभरात शेअरनं ६५ टक्के परतावा दिला आहे. कंपनीनं आपल्या डोक्यावरील कर्ज मोठ्या प्रमाणात कमी केल्यानंतर आणि निधी उभारणीला सुरुवात केल्यानंतर शेअरच्या किंमतीत हा बदल झाला आहे.

रिलायन्स पॉवर का आहे चर्चेत?

रिलायन्स पॉवरच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत वर्षाला अवघ्या ५ टक्के दरानं १० वर्षे मुदतीचं असुरक्षित परकीय चलन परिवर्तनीय रोखे (FCCB) जारी करण्यास मंजुरी दिली.

रिलायन्स पॉवरनं १७ सप्टेंबर रोजी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (VIPL) या माजी उपकंपनीच्या कर्जदारांना कॉर्पोरेट गॅरंटीपोटी ३,८७२.०४ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याची घोषणा केली. 

रिलायन्स पॉवरवर बँका आणि वित्तीय संस्थांचं शून्य कर्ज आहे, अशी माहिती कंपनीनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये दिली आहे. ३० जून २०२४ रोजी रिलायन्स पॉवरची नेटवर्थ ११,१५५ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner