Nandan Denim share price : दिवाळीतील मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या दरम्यान शुक्रवारी काही चिमुकल्या शेअर्सवर गुंतवणूकदार अक्षरश: तुटून पडले. वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित नंदन डेनिम लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. एक तासाच्या ट्रेडिंग सत्रात या कंपनीचा शेअर जवळपास ५ टक्क्यांनी वधारला आणि किंमत ६.१० रुपयांवर पोहोचली. तर शेअर ६.०६ रुपयांवर बंद झाला. तो आदल्या दिवसाच्या तुलनेत ४.३० टक्क्यांनी वधारून बंद झाला.
नोव्हेंबर २०२३ मध्ये हा शेअर २.२२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता, तर सप्टेंबर २०२४ मध्ये शेअरचा भाव ७.३३ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
नंदन डेनिम लिमिटेडचा शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिला तर प्रवर्तकांकडे ५१.०१ टक्के हिस्सा आहे. तर, सार्वजनिक भागधारकांकडे ४८.९९ टक्के हिस्सा आहे. जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत प्रवर्तकांनी आपला हिस्सा कमी केला आहे. जून तिमाहीत प्रवर्तकांचा कंपनीत ५८.४७ टक्के हिस्सा होता. प्रवर्तकांमध्ये कंपनीचा सर्वात मोठा हिस्सा चिरीपाल इंडस्ट्रीज लिमिटेडकडे आहे.
नुकतेच नंदन डेनिमने सप्टेंबर २०२४ तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे कामकाजातून मिळणारे स्वतंत्र उत्पन्न या तिमाहीत वाढून ८५०.२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ४१४ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न ४१८ कोटी रुपयांवरून ५२१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत करोत्तर नफा (पीएटी) वाढून ८.७ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीतील ८.२ कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा ६ टक्क्यांनी अधिक आहे.
नंदन डेनिम ही कंपनी गारमेंट्स व्यवसायात आहे. ही कंपनी निट डेनिम, बेसिक डेनिम, लाइटवेट शर्टिंग, क्लासिकल ट्विल डेनिम आणि डॉबी सह विविध प्रकारची डेनिम उत्पादने देते. कंपनीने १५ हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात केली आहेत. ताज्या अंदाजानुसार, कॅलेंडर वर्ष २०२४ ते २०३२ पर्यंत जागतिक डेनिम उद्योग ५.८१ टक्के सीएजीआरने वाढेल आणि १११.७५ अब्ज डॉलरच्या बाजारपेठेच्या आकारापर्यंत पोहोचेल.