अवांटेलच्या निव्वळ नफ्यात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ; बातमी फुटताच शेअरनं घेतली मोठी झेप
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अवांटेलच्या निव्वळ नफ्यात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ; बातमी फुटताच शेअरनं घेतली मोठी झेप

अवांटेलच्या निव्वळ नफ्यात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ; बातमी फुटताच शेअरनं घेतली मोठी झेप

Published Oct 07, 2024 10:42 AM IST

Avantel Share Price : सप्टेंबर तिमाहीच्या भक्कम आर्थिक निकालानंतर अवांटेलच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४४ टक्के वाढ झाल्याचा हा परिणाम आहे.

अवांटेलच्या निव्वळ नफ्यात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ; शेअर बाजारात लगेच परिणाम, शेअरची मोठी उसळी
अवांटेलच्या निव्वळ नफ्यात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ; शेअर बाजारात लगेच परिणाम, शेअरची मोठी उसळी

Stock Market Updates : टेलिकॉम प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अवांटेलच्या शेअरमध्ये आज प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी, ३ ऑक्टोबर रोजी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हा शेअर १३  टक्क्यांनी वाढून २०१ रुपयांवर पोहोचला. सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीच्या कंपनीच्या भक्कम आर्थिक निकालांनंतर शेअरच्या भावात ही लक्षणीय वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अवांटेलनं ७७.९१ कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाची नोंद केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा ५४ कोटी रुपये होता. यावर्षी तो ४४.२७ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा निव्वळ नफा देखील १६ कोटी रुपयांवरून ४३.७५ टक्क्यांनी वाढून २३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीच्या उत्पन्न अहवालानुसार, कम्युनिकेशन्स आणि सिग्नल प्रोसेसिंग प्रॉडक्ट्स सेगमेंटमधील उत्पन्न ७७.७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षी याच कालावधीत ५४ कोटी रुपये होतं.

वर्षभरात १२० टक्क्यांचा परतावा

अलीकडच्या वर्षांत, अवांटेलच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दणदणीत परतावा दिला आहे. ऑर्डरमधील सातत्य आणि कामगिरीत उत्तरोत्तर सुधारणेमुळं हे शक्य झालं आहे. गेल्या वर्षभरात अवांटेलचे शेअर्स १२० टक्क्यांनी वधारले असून गेल्या पाच वर्षांत हे शेअर्स ३.३० रुपयांवरून १८९ रुपयांच्या सध्याच्या ट्रेडिंग व्हॅल्यूवर पोहोचले आहेत. आज ११.२६ मिनिटांनी हा शेअर जवळपास साडेसात टक्क्यांनी वाढून १९१.५९ वर ट्रेड करत आहे.

काय करते ही कंपनी?

अवांटेल ही प्रामुख्यानं एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी वायरलेस आणि उपग्रह संप्रेषण उत्पादनं, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स, रडार प्रणाली आणि नेटवर्क व्यवस्थापन सॉफ्टवेअर अनुप्रयोगांचे डिझाइन, विकास आणि देखभाल यात कार्यरत आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, कंपनीनं उपग्रह संप्रेषण, एचएफ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि रडार सिस्टम या चार प्रमुख वर्टिकल्समध्ये सिस्टम-आधारित सोल्यूशन्स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. 

अंतराळ क्षेत्राच्या खासगीकरणामुळं नवे मार्ग खुले झाले आहेत आणि कंपनी या महत्त्वपूर्ण व्यावसायिक संधींचा फायदा घेण्यास सज्ज झाली आहे. भारतीय संरक्षण क्षेत्राला अद्वितीय, अनुकूल सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त विभागांमध्ये प्रवेश करण्याची कंपनीची योजना आहे.

मजबूत ऑर्डर बूक

सप्टेंबरमध्ये कंपनीला लार्सन अँड टुब्रो लिमिटेडकडून ४४.४९ कोटी रुपयांचे कंत्राट आणि सॅटकॉम प्रणालीच्या पुरवठ्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून ३.४५ कोटी रुपयांची ऑर्डर यासह अनेक महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळाल्या. याव्यतिरिक्त, कंपनीला न्यूस्पेस इंडिया लिमिटेडकडून ग्राउंड सेगमेंट हबचा पुरवठा, इन्स्टॉलेशन आणि कार्यान्वित करण्यासाठी ९.३९ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली. न्यूस्पेस इंडियाकडून महिन्याभरात मिळालेली ही दुसरी ऑर्डर आहे. कंपनीला यापूर्वी ऑगस्टमध्ये अशीच वर्कऑर्डर मिळाली होती. त्याची किंमत ६७.९२ कोटी रुपये होती.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner