Multibagger Stock : शेअर बाजारात घसरणीची शर्यत सुरू असताना 'या' शेअरनं घेतली मोठी उसळी, तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stock : शेअर बाजारात घसरणीची शर्यत सुरू असताना 'या' शेअरनं घेतली मोठी उसळी, तुमच्याकडं आहे का?

Multibagger Stock : शेअर बाजारात घसरणीची शर्यत सुरू असताना 'या' शेअरनं घेतली मोठी उसळी, तुमच्याकडं आहे का?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 13, 2024 06:45 PM IST

Aditya Vision Share Price : आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअरनं बाजारात धुमाकूळ घातला आहे. मागच्या पाच वर्षांत या शेअरनं तब्बल २३ हजार टक्क्यांचा परतावा दिला आहे.

आदित्य व्हिजनचा शेअर 574.95 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
आदित्य व्हिजनचा शेअर 574.95 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Stock market updates : मागच्या तीन दिवसांपासून शेअर बाजाराचा प्रवास उलट्या दिशेनं सुरू आहे. आजही तोच ट्रेंड कायम राहिला. सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला. मात्र, मल्टिबॅगर कंपनी आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअरमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. हा शेअर बुधवारी ९ टक्क्यांनी वधारून ४६९ रुपयांवर पोहोचला.

इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन चालवणाऱ्या आदित्य व्हिजनचे तिमाही निकाल चांगले आले आहेत. त्याचं प्रतिबिंब शेअरच्या किंमतीत उमटलं आहे. गेल्या ५ वर्षांत आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअर्समध्ये २३ हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

आदित्य व्हिजन लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत १२.२१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २६.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत आदित्य व्हिजनला ९.६३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी वाढून ३७५.८५ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत आदित्य व्हिजन लिमिटेडचा महसूल ३१३.१३ कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ६ नवीन स्टोअर्स उघडले असून आता त्याच्या स्टोअर्सची संख्या १५६ वर पोहोचली आहे.

गुंतवणूकदारांना केलं मालामाल

आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षात २३२०० टक्के वाढ झाली आहे. २ नोव्हेंबर २०१९ रोजी कंपनीचा शेअर २ रुपयांवर होता. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४६९ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ४ वर्षांत आदित्य व्हिजनच्या शेअर्समध्ये १७३०० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५७४.९५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २८३.७५ रुपये आहे.

शेअरचं केलं होतं १० भागांत विभाजन

मल्टिबॅगर कंपनी आदित्य व्हिजन लिमिटेडनेही आपल्या शेअर्सची विभागणी केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये कंपनीने १० रुपयांच्या अंकित मूल्याच्या शेअरची १ रुपयांच्या अंकित मूल्याच्या १० शेअर्समध्ये विभागणी केली. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलनं आदित्य व्हिजनवर बाय रेटिंग कायम ठेवले आहे. मात्र, कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस ५५० रुपयांपर्यंत कमी केली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner