Shein App Back : चीनचा फास्ट फॅशन ब्रँड अॅप 'शीन' ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलशी झालेल्या करारानंतर शीन १ फेब्रुवारी २०२५ पासून भारतात परतला आहे. या अॅपला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. त्यामुळं टाटासह दिग्गज फॅशन कंपन्यांचं टेन्शन वाढलं आहे.
‘शीन’ अॅपवर लेटेस्ट फॅशन वेअर कमीत कमी किंमतीत म्हणजेच अगदी १९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. याआधीही भारतात हा अॅप जबरदस्त लोकप्रियता झाला होता. भारत सरकारनं २०२० मध्ये टिकटॉकसह काही चिन्ही अॅप्सवर बंदी घातली होती. या बंदीचा फटका शीनलाही बसला होता.
रिलायन्स रिटेलनं शीन पुन्हा लाँच केल्यानं भारतातील वाढत्या फॅशन मार्केटमध्ये स्पर्धा वाढली आहे. रिलायन्स रिटेल हे टाटा समूहातील ट्रेंटच्या मालकीची ज्युडिओ आणि नायका या फॅशन कंपनीची थेट स्पर्धक आहे.
रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताची एकूण फॅशन बाजारपेठ केवळ ६ टक्के वाढली, फास्ट फॅशन सेगमेंटनं वार्षिक ३० ते ४० टक्के वाढ नोंदविली आणि आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत त्याचं मूल्य ५० अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतं. रिलायन्सच्या व्यापक वितरण नेटवर्कचा फायदा घेत शीन डेटा आधारित विश्लेषण, लीन मॅन्युफॅक्चरिंग आणि वेगवान पुरवठा साखळीसह परवडणारी फॅशन लोकांपर्यंत नेण्यास मदत करणार आहे.
ही एक चिनी कंपनी असून हिची स्थापना २००८ मध्ये करण्यात आली होती. कंपनीचे संस्थापक शू यांगतियान आहेत. भारतात बंदी येण्याआधी ही कंपनी दररोज २० ते ५० हजार ऑर्डर डिलिव्हरी करत होती. २०२३ पर्यंत कंपनीचे ५३ दशलक्ष सक्रिय युजर्स होते. आता भारतात कंपनीचं अॅप पुन्हा लाँच झालं असून आयफोन युजर्स अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करू शकतात.
संबंधित बातम्या