मुकेश अंबानींची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे, अवघ्या २४ तासांत झाली ‘इतकी’ वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  मुकेश अंबानींची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे, अवघ्या २४ तासांत झाली ‘इतकी’ वाढ

मुकेश अंबानींची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे, अवघ्या २४ तासांत झाली ‘इतकी’ वाढ

Jan 12, 2024 06:46 PM IST

Mukesh Ambani Net Worth : देशातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्याही पुढं गेली आहे.

Mukesh Ambani
Mukesh Ambani (ANI)

Mukesh Ambani Richest Man in Asia : देशातील आघाडीचा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे गौतम अदानी यांना मागे टाकत पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलरच्याही पुढं गेली आहे. मागच्या अवघ्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीमध्ये ३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 

ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी हे १३ व्या स्थानी घसरले होते. शुक्रवारी त्यांच्या संपत्तीत जवळपास ३ अब्ज डॉलरनं वाढ झाली आणि त्यांनी पुन्हा पहिल्या स्थानी झेप घेतली.

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. या वाढीमुळं आदल्या दिवशीच्या तुलनेत अंबानी थेट २.८ अब्ज डॉलर्सनी श्रीमंत झाले आणि त्यांनी १०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला, असं ब्लूमबर्गच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.

PNB News : पंजाब नॅशनल बँकेनं दहा दिवसांत दुसऱ्यांदा वाढवले एफडीचे व्याजदर

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)चा तिमाही अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. कंपनीच्या नफ्यात वाढ झाल्यामुळं कंपनीचे शेअर्स ऑक्टोबर २०२३ च्या नीचांकावरून थेट २२ टक्क्यांनी उसळले. ऊर्जा, टेलिकम्युनिकेशन्स व रिटेलसह विविध क्षेत्रात असलेल्या रिलायन्समध्ये मुकेश अंबानी यांचं ४२ टक्के भागभांडवल आहे. साहजिकच शेअरमधील वाढीमुळं त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

अवघ्या एक आठवड्यापूर्वी, ब्लूमबर्ग इंडेक्समध्ये मुकेश अंबानी ९६ अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदानी यांच्या मागे होते, तर अदानी समूहाचे अध्यक्ष ९६.७ अब्ज डॉलर्स संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

१०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये आणखी कोण?

मुकेश अंबानी यांच्यासह १२ उद्योजक १०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये आहेत. त्यात बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि जेफ बेझोस यांचा समावेश आहे. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडं २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे.

PPF Account : इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी पीपीएफ खातं महत्त्वाचं! कसं सुरू करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

रिलायन्सचं बाजार भांडवल १८ लाख कोटींच्या पुढे

भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किंमती ३ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात शेअरमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्सचं बाजार भांडवल गुरुवारी १८ लाख कोटींच्या पुढं गेलं. केवळ रिलायन्सच नव्हे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (जेएफएसएल) नं देखील मुकेश अंबानींच्या संपत्ती वाढीत मोठा हातभार लावला आहे.

Whats_app_banner