Jio Blackrock Broking Pvt ltd : कर लो दुनिया मुठ्ठी मे… असं म्हणत एकामागोमाग एका क्षेत्रात बस्तान बसवत चाललेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहानं आता आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आहे. रिलायन्स समूहातील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीनं आता ब्रोकिंगच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. त्यासाठी नवी उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये नुकतीच याची माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनीचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडनं 'जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड' नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी ब्रोकिंग उपक्रमांमध्ये सक्रीय असेल.
कंपनीनं दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये स्थापन झालेल्या जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त कंपनीत जिओ आणि ब्लॅकरॉक दोघांनी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक केली आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिसऱ्या २९५ कोटी रुपयांवर स्थिर राहिला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ६८९ कोटी रुपये होता.
चालू तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून ४४९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत ४१४ कोटी रुपये होतं. एकूण खर्चातही वार्षिक आधारावर वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. हा खर्च गेल्या वर्षी याच तिमाहीत ९९ कोटी रुपये होता, तो १३१ कोटी झाला आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या नऊ महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा किरकोळ सुधारून १,२९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १,२९४ कोटी रुपये होता.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर मंगळवारी दिवसभरात ५.६९ टक्क्यांनी घसरून २६० रुपयांवर बंद झाला. मागच्या सहा महिन्यांत जिओचा शेअर जवळपास २४ टक्क्यांनी घसरला आहे. तर चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत त्यात १४.६० टक्के घसरण झाली आहे. जिओ फायनान्शियलच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ३९४.७० रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २३७.०५ रुपये आहे.
संबंधित बातम्या