Share Market News Update : मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम आयपीओ बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. जिओनं आयपीओ आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या आयपीओचा आकार ३५,००० ते ४०,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. देशातील हा सर्वात मोठा आयपीओ असेल, असा अंदाज आहे.
द हिंदू बिझनेसलाइननं दिलेल्या वृत्तानुसार, आयपीओमध्ये प्री-आयपीओ प्लेसमेंटसह ऑफर फॉर सेल आणि नवीन इश्यूचा समावेश असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स समूह वर्षाच्या उत्तरार्धात हा आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. बँकर्सच्या म्हणण्यानुसार, इश्यूचा आकार मोठा असेल पण त्याला पुरेशी मागणी असेल. आयपीओचं सब्सक्रिप्शन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये हे पाहिलं जाणार आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटची रक्कम नव्या इश्यूच्या आकारावर अवलंबून असेल, असं इन्व्हेस्टमेंट बँकर्सनी सांगितलं. आयपीओची ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्यू यांच्यातील विभागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही.
रिलायन्स जिओला जिओ प्लॅटफॉर्मअंतर्गत ठेवण्यात आलं आहे. यात परदेशी गुंतवणूकदारांचा सुमारे ३३ टक्के हिस्सा आहे. २०२० मध्ये रिलायन्सनं आपला हिस्सा अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी, केकेआर, मुबाडाला आणि सिल्व्हर लेक सारख्या अनेक फंडांना विकून सुमारे १८ अब्ज डॉलर्स उभे केले होते.
ब्रोकरेज कंपनीनं रिलायन्स जिओचं मूल्यांकन सुमारे १०० अब्ज डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही रक्कम सुमारे १२० अब्ज डॉलर्स असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. अलीकडंच, जिओ प्लॅटफॉर्म्सनं एआय भाषा मॉडेल विकसित करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञान दिग्गज एनव्हीडियासोबत भागीदारीची घोषणा केली. तंत्रज्ञानासह एआयवर लक्ष केंद्रित केल्यानं स्टार्टअपपेक्षा स्पर्धात्मक आघाडी मिळेल अशी अपेक्षा आहे. उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी आर जिओला नियामक मान्यता देखील मिळाली आहे. आरआयएलनं गेल्या ५ वर्षांत आपल्या टेलिकॉम, इंटरनेट आणि डिजिटल व्यवसायांच्या अधिग्रहणात सुमारे ३ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. रिलायन्स जिओ ऑक्टोबरअखेर ४६ कोटी वायरलेस ग्राहकांसह देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे.
संबंधित बातम्या