मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share market news : मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर १ रुपयावरून २८ रुपयांवर, तुमच्याकडं आहे का?

Share market news : मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर १ रुपयावरून २८ रुपयांवर, तुमच्याकडं आहे का?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 19, 2024 07:34 PM IST

Alok Industries Share Price : मुकेश अंबानी यांचा वरदहस्त असलेल्या आलोक इंडस्ट्रीजनं मागच्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मालमाल करून टाकलं आहे.

अंबानींची साथ मिळताच नशीब पालटलं! १ रुपयावरून २८ रुपये झाला शेअर, तुमच्याकडं आहे का?
अंबानींची साथ मिळताच नशीब पालटलं! १ रुपयावरून २८ रुपये झाला शेअर, तुमच्याकडं आहे का?

Alok Industries Share price : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील एक कंपनी असलेल्या आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडनं गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना दणदणीत परतावा मिळवून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी १.४० रुपये किंमत असलेला या कंपनीचा शेअर आता २८ रुपयांवर गेला आहे. 

वस्त्रोद्योगात कार्यरत असलेल्या या कंपनीनं ऑक्टोबर २०१९ ते आतापर्यंत गुंतवणूकदारांना १९०० टक्के परतावा दिला आहे. टक्क्यांपेक्षा आकडेवारीत समजून घेतल्यास हा परतावा किती भरघोस आहे याचा अंदाज सहज येऊ शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदारानं मार्च २०२० मध्ये या शेअरमध्ये १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याची रक्कम २ लाख रुपये झाली असती.

एका वर्षात ११४ टक्के परतावा

मागच्या एका वर्षात आलोक इंडस्ट्रीजचा शेअर ११४ टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये ३१ टक्के वाढ झाली आहे. मार्चमध्ये आतापर्यंत हा शेअर ३.५ टक्क्यांनी घसरला आहे. फेब्रुवारी महिन्यात या शेअरमध्ये ११ टक्के घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, यावर्षी जानेवारीत त्यात ५१.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ९ जानेवारी २०२४ रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर ३९.०५ रुपयांवर असलेला हा शेअर सध्या २८ टक्क्यांनी खाली आला आहे. तर, १०.९० रुपये हा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. नीचांकापासून हा शेअर १५६ टक्क्यांनी वाढला आहे.

काय करते ही कंपनी?

आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कापड निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करते. हे दैनंदिन वापरातील कापड, नालीदार पॅलेट्स, सूत आणि मिश्रित धागे, विणलेले कापड, घरगुती कापड, पॉलिस्टर धागे आणि भरतकाम उत्पादने, शॉपिंग बॅग आणि रुमाल ही कंपनीची उत्पादनं आहेत. कंपनीची स्थापना १९८६ मध्ये झाली. कंपनीचं मुख्यालय मुंबईत आहे.

डिसेंबर तिमाही निकाल

डिसेंबर तिमाहीत (Q3 FY24), कंपनीला २१५.५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला २४१.४३ कोटीचा तोटा झाला होता. तर, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल २६ टक्क्यांनी घसरून १२१७ कोटी झाला आहे.

काय म्हणतात मार्केट एक्सपर्ट्स?

आयसीआयसीआय डायरेक्टच्या मते, कंपनीचा नेट कॅश फ्लो आणि दैनंदिन व्यवहारांतून रोख वाढत आहे. गेल्या २ वर्षांत नेट कॅश फ्लोमध्ये आश्वासक सुधारणा झाली आहे. महसूल आणि नफ्यात होणारी घट ही अर्थातच चिंतेची बाब आहे. गेल्या ४ तिमाहीत प्रत्येक तिमाहीत महसुलात घट झाली आहे. त्यामुळं कंपनी सध्या कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांच्या श्रेणीत मोडते.

आलोक इंडस्ट्रीजमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे १,९८,६५,३३,३३३ शेअर्स किंवा ४०.०१ टक्के शेअर्स आहेत. तर जेएम फायनान्शियल असेट रिकंन्स्ट्रक्शन (JM Financial Asset Reconstruction) कंपनीकडं ३४.९९ टक्के शेअर आहेत.

 

(Desclaimer: वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel